सात दिवसांत तीन लाख उंदीर मारल्याच्या सरकारी दाव्यावर खडसेंचाच आक्षेप

राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात उंदरांनी उच्छाद मांडला, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील उंदीर मारण्याची महामोहीम हाती घेतली. त्याची सुरस कथा विधानसभेत ऐकवत राज्याचे माजी मंत्री आणि भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी या मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाच, पण राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरेही विधानसभेच्या वेशीवर टांगली.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने महत्त्वाच्या फायली खराब होतात, अशा तक्रारी आल्यानंतर २०१६ मध्ये उंदीर मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. उंदरांची मोजणी करण्यात आली, तेव्हा एकटय़ा मंत्रालयातच तीन लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचे आढळले. यात काही उंदीर काळे, काही पांढरे, काही गलेलठ्ठ, काही म्हातारे, काही नुकतेच जन्मलेलेही होते. त्यांचे निर्मूलन करण्याचे ठरले, आणि निविदा जारी करण्यात आली. अगोदर या कामासाठी सहा महिन्यांचे कंत्राट देण्याचे ठरले होते. पण या काळात पुन्हा नवे उंदीर जन्माला येतील व त्यांची संख्या वाढेल असे लक्षात आल्याने कंत्राटाचा कालावधी कमी करत करत उंदीर निर्मूलनाचे काम सात दिवसांत पूर्ण करण्याचे ठरले, असे सांगत खडसे यांनी या मोहिमेची झाडाझडतीच सभागृहात घेतली.

या उंदीर निर्मूलन मोहिमेच्या कहाणीतून सरकारच्या भ्रष्ट कारभाराची वस्त्रे उतरविण्यास खडसे यांनी सुरुवात केल्याने, सत्ताधारी बाकांवर अस्वस्थता पसरली. तरीही ही कथा ऐकण्यासाठी सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सर्वाचेच कान सरसावले होते. सारे सभागृह स्तब्ध झाले. सदस्य कान देऊन या मोहिमेची कहाणी खडसे यांच्या तोंडून ऐकू लागले.

खडसे म्हणाले, ‘‘उंदीर निर्मूलनासाठी निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सात दिवसांत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्यात आले. याचा अर्थ, प्रत्येक दिवसाला ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारण्यात आले. म्हणजे प्रत्येक मिनिटाला ३१.६४ उंदरांचा खात्मा करण्यात आला. प्रत्येक दिवशी मारण्यात आलेल्या उंदरांचे वजन ९१२५.७१ किलो एवढे, म्हणजे, एक ट्रक भरेल एवढे उंदीर एका दिवसाला मारण्यात आले. एवढय़ा उंदरांची विल्हेवाट कुठे लावली? त्यांचे दफन केले, की त्यांना जाळले, याची काहीच माहिती उपलब्ध नाही!’’ खडसेंच्या या उद्गारांवर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या..

‘‘हा एक विक्रम आहे,’’ असे खोचक स्वरात सांगत, क्षणभर थांबून खडसे यांनी सभागृहात सभोवार नजर फिरविली. साऱ्या नजरा विस्फारल्या होत्या. काही बाकांवर अस्वस्थ चुळबुळ सुरू होती. मग खडसे पुढे बोलू लागले, ‘‘मुंबई महापालिका दोन वर्षांत सहा लाख उंदीर मारते. मंत्रालयातील उंदीर निर्मूलन मोहिमेत तर, सात दिवसांत तीन लाखांहून अधिक उंदीर मारण्यात आले. हा एक विक्रम असल्याने, ही मोहीम राबविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का?’’ त्यांच्या या खोचक  प्रश्नाने सरकारच्या कारभाराचे वाभाडेच काढले. ‘‘लाखो रुपये खर्च करून अशा खोटय़ा मोहिमा राबविण्यापेक्षा मंत्रालयात दहा मांजरे पाळली असती तरी काम झाले असते,’’ असा सणसणीत टोला त्यांनी मारला, आणि विरोधी बाकांवर हास्याचा स्फोट झाला. एवढा वेळ अस्वस्थपणे खडसे यांचे भाषण ऐकणाऱ्या सत्ताधारी सदस्यांनाही यावेळी हसू आवरता आले नाही.

मग शेवटचा टोला हाणण्यासाठी खडसे क्षणभर थांबले. सामान्य प्रशासन विभागात झालेल्या या गैरव्यवहाराची चौकशी करा, असे सांगताना त्यांचा सूर काहीसा कडवट झाला. एकटय़ा मंत्रालयात उंदरांचा एवढा सुळसुळाट असेल, तर सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळांमध्ये किती उंदीर असतील, असे खोचकपणे सुनावत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा, असेही ते म्हणाले.

मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. या उंदीर निर्मूलन मोहिमेसाठी एवढे विष मंत्रालयात आणले तरी त्यासाठी गृह, सामान्य प्रशासन विभागाची परवानगीच घेण्यात आली नव्हती, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला आणि पुन्हा सभागृह सुन्न झाले. सारे सदस्य या अवस्थेत असतानाच खडसे यांनी अक्षरश: नवा शाब्दिक बॉम्ब सभागृहात टाकला. ‘‘धर्मा पाटील यांनी हेच विष घेऊन आत्महत्या केली,’’ असे सांगून उंदीर निर्मूलनाच्या या गमतीदार कहाणीची करुण अखेर खडसे यांनी केली, तेव्हा सभागृहात खळबळही माजली होती..