भाजपाला रामराम केल्यानंतर अखेर आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आयुष्यातली ४० वर्षे मी भाजपामध्ये काम करत आलो आहे. ४० वर्षे पक्षात राहिल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत वारंवार माझी बदनामी झाली, छळ करण्यात आला. गैरव्यवहार असेल तर कागदपत्रं द्या.. मात्र या क्षणापर्यंत मला उत्तर मिळालेला नाही. मी आजवर खूप संघर्ष केला. मंत्रिमंडळात येण्यासाठीही मला संघर्ष करावा आहे. तो माझा स्थायीस्वभाव आहे. भाजपाचं काम करत असताना उत्तर महाराष्ट्रात पक्षाला बळकटी देण्याचं काम आम्ही सातत्यानं केलं. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपात माझ्यावर अन्याय झाला आहे असंही खडसे यांनी आज बोलून दाखवलं.