गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपचा बहुजन चेहरा म्हणून बघितले जायचे. मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरले व त्यांच्या अखेरच्या टप्प्यात पक्षात कोंडी झाली होती. पदाचा दुरुपयोग केल्याने खडसे यांचाही राजकीय बळी गेला. एकूणच पक्षाचे बहुजन नेतृत्व नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.
भाजपच्या स्थापनेपासून पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेल्या खडसे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले. वैयक्तिक आयुष्यात मुलाचे निधन, प्रकृती अस्वास्थ्य यांनाही खडसे यांनी तोंड दिले. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर ओबीसी किंवा बहुजन समाजाचा चेहरा असलेले नेतृत्व भाजपकडे नाही.
पक्षाची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा होती. मोदी व शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना संधी दिल्याने खडसे संतप्त झाले. तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पंगा घेतला होता. खात्याच्या सचिवाच्या बदलीवरूनही त्यांनी मुख्यमत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातील बदलत्या राजकीय संदर्भाचा खडसे यांनी बोध घेतला नाही. मोदी व शहा यांच्या मर्जीतील फडणवीस यांच्या विरोधात जाण्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे.
नेतृत्वासाठी संघर्ष
मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी चेहरा म्हणून स्वत:चे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण पंकजा यासुद्धा कायमच वादग्रस्त ठरल्या आहेत. चिक्की घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले. अलीकडेच दारूच्या कारखान्यांना पाणी देण्यावरून त्यांनी वाद निर्माण केला. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच’ अशी विधाने करून स्वत:चे नुकसान करून घेतले.
ओबीसी किंवा बहुजन समाजाचे नेते अशी ओळख निर्माण केलेले छगन भुजबळ हे मातबर नेते सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. भुजबळ अटकेत, खडसे यांच्यावर विविध आरोप, पंकजा मुंडे या अजूनही अननुभवी त्यामुळे राज्यात ओबीसी समाजाचा राज्यमान्य चेहराच दिसत नाही.

ओबीसी आणि राणे व पृथ्वीराजबाबांमधील मतभेद
एकनाथ खडसे हे बहुजन समाजाचे नेते असल्यानेच त्यांचा राजीनामा भाजपने घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी करून ओबीसी समाजात भाजपबद्दल विरोधी मत तयार करण्याचा प्रयत्न केला. पण राणे यांचा हा दावा दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोडून काढला. खडसे यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. यातूनच खडसे यांना राजीनामा द्यावा लागला, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.