पुण्यात बालेवाडी येथील आठ लाख ७९ हजार चौरस फूट रामोशी वतन जमीन नागरी कमाल जमीन धोरणाबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून विकण्यात आली. यात राज्य सरकारचे १७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ही जमीन सध्या अतुल चोरडिया आणि सदानंद सुळे यांच्या कंपनीच्या ताब्यात आहे. पुण्यात मंगलदास गल्लीतील ११,५६८ चौरस मीटर जमिनीचा व्यवहारही अशाच बनावट कागदपत्रांच्या साह्याने झाला व सरकारचे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाले,  अशी टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केली.
विरोधकांनी मांडलेल्या चर्चेवर बोलताना खडसे यांनी पुणे व परिसरातील जमिनींच्या बेकायदा व्यवहारांची प्रकरणे मांडली. बालेवाडीतील रामोशी जमिनीच्या व्यवहारात जागेची मालकी बालेवाडी प्रॉपर्टीज प्रा. लि.कडे आली आहे. अतुल चोरडिया आणि सदानंद सुळे यांची ही कंपनी आहे. त्यांनी रीतसर परवानगी घेतली असती तर नागरी कमाल जमीन धारणा कायद्यानुसार आठ लाख ७९ हजार चौरस फूट जमिनीपैकी केवळ १० हजार चौरस फूट जमीन बांधकामास मिळाली असती व बाकीची आठ लाख ६९ हजार ४१८ चौरस फूट जमीन अतिरिक्त ठरून सरकारजमा झाली असती. त्यामुळेच  बनावट कागदपत्रांच्या आधारे या जमिनीचे व्यवहार झाले,असे खडसे यांनी सांगितले.
तर पुण्यातील मंगलदास गल्लीतील ११,५६८ चौरस मीटर जमीन ही पारशी व्यक्तीच्या मालकीची होती. त्या जमिनीचा व्यवहारही बनावट कागदपत्रांच्या आधारे झाला. ही जमीन आता पाम ग्रुव बीच हॉटेल्स प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या ताब्यात आहे. ही कंपनी जी. एल. रहेजा ग्रुपच्या मालकीची असून या प्रकरणात ९०० कोटींची जमीन आहे.  सरकारने ही जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली.