ग्रामीण भागातील रुग्णालये डॉक्टरांअभावी, पुरेशा वैद्यकीय साधनांअभावी ओस पडत आहेत. जळगावमधील उपजिल्हा रुग्णालयाला दोन-तीन वर्षे झाली तरी डॉक्टर मिळत नाहीत. हे असेच चालणार असेल तर ग्रामीण रुग्णालयांना समारंभपूर्वक टाळे ठोका, असे संतप्त उद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत काढले. एमबीबीएस डॉक्टर मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टर तरी घ्यावेत व रुग्णांना आरोग्यसेवा द्यावी, अशी मागणीही खडसे यांनी केली.  प्राथमिक आरोग्य केंद्रांचा नव्याने आराखडा तयार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी जळगावातील प्रश्न सोडवण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.

गिरीश महाजन लक्ष्य

वैद्यकीय सेवेचा बोऱ्या वाजल्याचा आरोप करत खडसे यांनी जळगाव जिल्ह्य़ातील त्यांचे स्पर्धक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनाही लक्ष्य केले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात केवळ चार व्हेंटिलेटर असल्याने सुविधेअभावी शनिवारी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास तेथील डॉक्टरांनी नकार दिला. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा सोमवारी असाच प्रकार घडला.याची जबाबदारी कोण घेणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी खडसे यांनी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे गैरहजर असल्याने त्यांच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले.