माजी महसुलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना चांगलेच अडचणीत आणले. यावेळी खडसे यांनी कोल्हापूर आणि जळगावमधील शालेय पोषण आहार योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा उपस्थित केला. या योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खडसे यांनी या सगळ्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जावी, अशी मागणी केली. एकनाथ खडसेंच्या या आरोपांना उत्तर देताना विनोद तावडे यांनी आम्ही याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करू, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलल्यावर खडसे शांत होतील, अशी तावडेंची अपेक्षा होती. मात्र, तावडेंच्या या उत्तरावर खडसे चांगलेच चिडले. मंत्री असतानाही तुम्ही शिफारस कसली करता? तुमच्या अखत्यारित निर्णय घेऊन चौकशीचे आदेश द्या, असे खडसेंनी भर सभागृहात तावडे यांनी सुनावले.

शालेय पोषण आहार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. पोषण आहाराचे कंत्राटे ठराविक लोकांनाच का दिली जातात? यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) या सगळ्याची चौकशी झाली आहे. त्यामधून फार काही निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे आता एसआयटीतर्फे या सगळ्याचा तपास व्हावा, अशी मागणी खडसे यांनी केली होती.

दरम्यान, जळगावमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून नुकताच एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला होता. मागील महिन्यात पक्षाच्या जिल्हा बैठकीत दोघांचे समर्थक प्रथमच एकमेकांना जाहीरपणे भिडल्यानंतर आता जिल्हा परिषद सभापती निवडणुकीदरम्यान या दोन्ही बडय़ा नेत्यांमधील वाद टोकाला गेले आहेत. या वादामुळे जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समित्यांमध्ये खडसे व महाजन असे दोन गट पडले आहेत. गटातटाच्या राजकारणामुळेच जिल्ह्य़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादी तळाला गेल्याचा इतिहास असताना या दोन नेत्यांमधील वाद भाजपला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे अडचणीत आल्यानंतर भाजपने खडसेंना मंत्रिपदावरून दूर केल्यापासून जिल्ह्य़ातील खडसे गट दुखावला गेला. दुसरीकडे राज्य पातळीवरून महाजन यांना अतिरिक्त बळ देण्यास सुरुवात झाली. जिल्ह्य़ातील नगरपालिका, विधान परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान उमेदवारनिश्चितीपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर महाजन यांचाच वरचष्मा राहिला. त्यानंतर खडसे यांच्या नाराजीत वाढच होत गेली. निवडणुकीदरम्यान भाजपच्या बैठकीत खडसे व महाजन गटाचे कार्यकर्ते उघडपणे एकमेकांना भिडल्याने दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वादावर प्रथमच जाहीररीत्या शिक्कामोर्तब झाले.