आपल्यावरील सारे आरोप खोटे आहेत, असा दावा करणारे एकनाथ खडसे हकालपट्टी झाल्यानंतर तरी आपल्या तापट स्वभावानुसार काही तरी बोलतील, अशी अटकळ बांधली जात असली तरी गेले दोन दिवस खडसे यांनी मौन बाळगले आहे.

आपल्या विधानांनी खडसे अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. विविध आरोप व पुण्यातील जमिनीचे प्रकरण बाहेर आल्यावरही खडसे हे त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार बोलत होते. कोणी काहीही आरोप केले तरी त्याला किंमत किती द्यायची, असा त्यांचा युक्तिवाद होता. आपण काहीच चुकीचे केलेले नाही, असा पवित्रा राजीनाम्याची घोषणा करतानाही खडसे यांनी घेतला होता. खडसे यांना त्यांनी काहीच चुकीचे केलेले नाही, असे वाटत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा युक्तिवाद पटला नाही. यातूनच खडसे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

राजीनाम्याची घोषणा करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आपल्यावरील सारे आरोप खोडून काढताना बचावात्मक भूमिका घेतली होती. पक्षाने राजीनामा देण्यास सांगितल्याने खडसे भलतेच संतप्त झाले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावरील संताप दिसत होता. आपल्या नेहमीच्या शैलीत खडसे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधण्यात आली होती. पण दोन दिवस तरी खडसे यांनी पक्षशिस्त पाळली आहे. अजून तरी त्यांनी काहीच वादग्रस्त विधान केलेले नाही. खडसे काय बोलतात याकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. खडसे फार काळ गप्प बसू शकणार नाहीत, असे बोलले जाते. खडसे आता गप्प बसले तरी आगामी पावसाळी अधिवेशनात त्यांना बोलते करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने व्यक्त केली.खडसेंविरोधात काँग्रेस आंदोलन करणार दाऊदच्या पाकिस्तानमधील निवासस्थानातून खडसे यांना दूरध्वनी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसे यांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याचे सिद्ध होते. यामुळेच त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांच्याविरोधात मुंबईत काँग्रेस आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.