आपल्याच सरकारवर उंदीर घोटाळयाचा गंभीर आरोप करणारे माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी काही गोळया ठेवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा होत नाही. चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव बुद्धी देवो असे मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी कुठेही खडसेंचे नाव घेतले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या मुनगंटीवारांनी पत्रकारांशी बोलताना या उंदीर घोटाळयाच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. मंत्रालयात उंदरांनी फायली कुरतडू नये म्हणून काही गोळया ठेवल्या होत्या. जेवढया गोळया होत्या तेवढे उंदिर मेलेच पाहिजेत असा अर्थ काढणं योग्य नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे</strong>
खडसे म्हणाले, ‘‘उंदीर निर्मूलनासाठी निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सात दिवसांत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्यात आले. याचा अर्थ, प्रत्येक दिवसाला ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारण्यात आले. म्हणजे प्रत्येक मिनिटाला ३१.६४ उंदरांचा खात्मा करण्यात आला. प्रत्येक दिवशी मारण्यात आलेल्या उंदरांचे वजन ९१२५.७१ किलो एवढे, म्हणजे, एक ट्रक भरेल एवढे उंदीर एका दिवसाला मारण्यात आले. एवढय़ा उंदरांची विल्हेवाट कुठे लावली? त्यांचे दफन केले, की त्यांना जाळले, याची काहीच माहिती उपलब्ध नाही!’’

‘‘मुंबई महापालिका दोन वर्षांत सहा लाख उंदीर मारते. मंत्रालयातील उंदीर निर्मूलन मोहिमेत तर, सात दिवसांत तीन लाखांहून अधिक उंदीर मारण्यात आले. हा एक विक्रम असल्याने, ही मोहीम राबविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का?’’ त्यांच्या या खोचक प्रश्नाने सरकारच्या कारभाराचे वाभाडेच काढले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse sudhir mungantiwar rat scam mantralaya
First published on: 24-03-2018 at 15:27 IST