विधान परिषद सभापती पदावरून काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांना हटविण्यासाठी झालेल्या हातमिळवणीची चर्चा रंगलेली असतानाच भाजपने मंगळवारी राष्ट्रवादीच्या ताब्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) अध्यक्षा वैशाली नागवडे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, आमदार रामराव वडकुते यांच्यासह सात जणांचे सदस्यत्व रद्द करीत जोरदार दणका दिला. सरकारची परवानगी न घेता परदेश दौरा केल्याचा ठपका ठेवून दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी ही कारवाई केली असून या सात जणांना पुढील सहा वर्षांसाठी महानंदची निवडणूक लढण्यासही अपात्र ठरविण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या सत्ता केंद्राला जोरदार धक्का बसला आहे.
महानंदमध्ये सध्या एकूण ३३ संचालक आहेत. या सात संचालकांनी सरकारी परवानगी न घेता केलेली परदेशवारी आणि त्यासाठी घेतलेल्या अग्रिमे थकीत ठेवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महानंदच्या संचालक मंडळाला पाच वर्षांच्या काळात फक्त एकाच परदेश दौऱ्याची परवानगी आहे. सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय परदेश दौरा केल्यास या दौऱ्याचा खर्च सबंधित संचालकांकडून वसूल करण्याची तरतूद आहे. मात्र, सदर सात संचालकांनी २००९ मध्ये सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता. या दौऱ्यासाठी प्रत्येकी ९० हजार तर चीन दौऱ्यासाठी १ लाख २० हजार २५० रुपये अग्रिम महानंदमधून घेतला होता. कायद्याप्रमाणे संचालकांनी ३० दिवसांच्या आत अग्रिम संस्थेत जमा केला नाही. तसेच या खर्चाला सरकारची मान्यताही घेतली नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.