भाजप सोडण्यास भाग पाडू नका, अशी व्यथा व्यक्त करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कोंडी आणि परतीचे दोर कापल गेल्यानेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे संतप्त झाले असून, फडणवीस यांनी खडसे यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावून त्यांना पद्धतशीरपणे ताटकळत ठेवले आहे.

खडसे यांच्या चौकशीकरिता झोंटिग आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. पण खडसे यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्याने झोटिंग आयोगाचा अहवाल आता निर्थक ठरल्याचे मुख्यमंत्री खडसे यांनी हिवाळी अधिवेशानच्या समारोपप्रसंगी विधानसभेतच जाहीर केले होते. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मंत्रिमंडळात समावेश करून आपल्यावरील डाग पुसला जावा अशी खडसे यांची इच्छा आहे. गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुतांशी राज्यांमध्ये सत्ता मिळाली.

खडसे यांचा अपवाद वगळता भाजपच्या एकाही मंत्र्याला गैरव्यवहार किंवा अनियमिततेमुळे राजीनामा द्यावा लागलेला नाही. ही बाब खडसे यांना फारच लागली आहे. आपण पक्षाची ४० वर्षे सेवा केली किंवा पक्ष मोठा करण्यात हातभार लावला, असे खडसे वारंवार सांगत असले तरी पक्षाचे दिल्लीतील नेते खडसे यांच्या नाराजीची दखलच घेत नाहीत. पक्षात आपण इतके ज्येष्ठ असूनही नाराजीची दखल घेतली जात नाही हे सुद्धा खडसे यांना खटकले.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी व न्यायालयीन प्रकरणाचा छडा लागेपर्यंत खडसे यांचे पुनर्वसन होणार नाही याचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात दिले. यावरून मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्टच आहे. खडसे यांना लगेचच दिलासा द्यायचा नाही, असेच मुख्यमंत्र्यांचे धोरण दिसते. तसेच खडसे यांच्या जळगाव जिल्ह्य़ात त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या निकटवर्तीयाची उमेदवारी कापण्यात आली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ताकद देऊन जिल्ह्य़ातही मुख्यमंत्र्यांकडून आपली कोंडी केली जात असल्याचे खडसे यांच्या लक्षात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे आपल्या परतीचे दोर कापले गेल्याची भावना झाल्यानेच खडसे यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र यानुसार काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक साधली आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आपल्या भावना अजितदादांच्या कानात सांगितल्याचे त्यांनी उद्गार काढले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबरीने कार्यक्रमात सहभागी होताना थेट पक्ष सोडण्यापर्यंत भाषा केली. यावरून खडसे हे व्यथित झाल्याचे स्पष्टच आहे.