सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचे काम हे विरोधी पक्षनेत्याचे असते. मी विरोधी पक्षनेता असताना सरकारविरोधात जे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे भाजपचे सरकार येण्यात माझाही खारीचा वाटा आहे, अशी खदखद व्यक्त करताना ‘जे झालं ते झालं, जे काही घडलंय ते मी आणि मुख्यमंत्री आमच्या दोघांतच आहे. पण जे ठरलंय ते सांगणार नाही,’ असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लगावला. त्याचप्रमाणे युतीत काय ठरलंय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्या ठरावावर बोलताना खडसेंनी आपल्या पक्षातील नेत्यांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही टोलेबाजी केली. मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये सध्या वाद निर्माण झाला आहे. त्याबद्दल बोलताना खडसे यांनी हा उपरोधिक सल्ला दिला. गिरीश आत्ता आला, आधी तो निर्णयाच्या प्रकियेत नव्हता. तो जवळ झाला, विखेंना मंत्रिपद मिळाले, विखे पाटील आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेले, असे सांगत खडसे यांनी गिरीश महाजन आणि मुनगंटीवार यांनाही चिमटा काढला. भाजपचे सरकार येण्यात आधीच्याही विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती, असे सांगत स्वत:वर झालेल्या अन्यायाबाबत अप्रत्यक्षपणे खडसेंनी भाषणात नाराजीच व्यक्त केली. मात्र आज सरकार असूनही आपण काही वेळा मंत्र्यांवर टीका करतो, त्या वेळी खडसे विरोधी पक्षात जाणार का, असा संशय व्यक्त केला जातो. मात्र माझे आणि मुख्यमंत्र्यांचे ठरलं आहे. आमच्यात नेमकं काय ठरलंय, ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहीत आहे, असे सांगत खडसे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्याच वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांनी तुमच्यात काय ठरलंय ते येथे सांगू नका, असे सांगितले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांनी पुन्हा लक्ष्य केले. विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला, पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला आणि सत्तेत का आले ते कळले नाही. आई म्हणते बाळा गाऊ  कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उतराई, तसं आता वडेट्टीवारांना विखेंना म्हणावं लागेल तुझा होऊ  कसा उत्तराई, अशा मिश्कील टीका खडसे यांनी केली.

खडसेंची खदखद..

सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करून आपले सरकार आले पाहिजे ही विरोधी पक्षनेत्याची भूमिका आपण पार पाडली. भाजपचे सरकार येण्यात आधीच्याही विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती, असे सांगत स्वत:वर झालेल्या अन्यायाबाबत अप्रत्यक्षपणे खडसेंनी भाषणात नाराजीच व्यक्त केली.