गेल्या दहा वर्षांच्या काळात तुम्ही केलेली पापं आम्ही फेडतोय. तुमच्या चुकीच्या धोरणांची फळं शेतकऱ्यांना भोगायला लागत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री आणि विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधान परिषदेत विरोधकांवर केली. त्यांच्या उत्तरावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विरोधकांना उद्देशून खडसे म्हणाले, आताची परिस्थिती ही तुमच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक आहे. तुमच्या दहा वर्षांच्या काळात राज्यात भ्रष्टाचार झाला. शेतकऱ्यांवार अन्याय झाला आणि आता तुम्ही आरडाओरड करत आहात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तुम्ही केलेली पापं आम्ही फेडतोय, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.
दरम्यान, दुष्काळी उपाययोजनांवर विधानसभेमध्ये एकनाथ खडसे म्हणाले, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकर पुरविण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांत वाढ करण्यात आली आहे. एक कोटीपर्यंतच्या योजनांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच देण्यात आले आहेत. पाच कोटी रुपयांपर्यंतच्या योजनांचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त नसलेल्या गावांनाही गरजेनुसार टॅंकर पुरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. टंचाईग्रस्त गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना जास्तीचे अधिकार देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.