दहा दिवसांत घर सोडण्याचे मुलाला न्यायालयाचे आदेश

मुंबई : मुलगा आणि सुनेच्या छळवणुकीतून एका नव्वद वर्षांच्या दाम्पत्याची सुटका करताना उच्च न्यायालयाने मुली या लग्नानंतरही आईवडिलांकडे लक्ष देणे सोडत नाही, मुलगे मात्र लग्न होईपर्यंतच आईवडिलांच्या सोबत असल्याच्या म्हणीत सत्य असल्याचे म्हटले. त्याचवेळी संबंधित दाम्पत्याच्या मुलाला कुटुंबासोबत जुहू येथील आलिशान इमारतीतील घर दहा दिवसांत सोडण्याचे आदेश दिले.

आईवडिलांचे घर सोडण्याच्या देखभाल लवादाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या आदेशाला आशिष दलाल याने आव्हान दिले होते. आईवडिल आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याअंतर्गत लवादाने हे आदेश दिले होते. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी लवादाचा निर्णय योग्य ठरवत याचिकाकत्र्याला आईवडिलांचे घर सोडण्यासाठी दहा दिवस मुदत दिली.

न्यायालय म्हणाले…

आपल्यासमोरील प्रकरणात हताश आईवडिलांची दु:खद कहाणी आहे. त्यांना आयुष्याचा हा काळ शांततेत जगायचा आहे. त्यांच्या कमीत कमी अपेक्षा आणि गरजा आहेत. परंतु श्रीमंत मुलाकडून त्यांच्या या अपेक्षा आणि गरजांपासून वंचित राहावे लागत आहे. त्याचा विचारही मुलाला करावासा वाटत नाही. आपल्या वृद्ध आणि गरजू पालकांची काळजी घेण्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात याचिकाकर्ता पूर्णपणे अपयशी ठरला आहे. शिवाय त्याने या वयात त्यांना न्यायालयाची पायरी चढायला लावली आहे, असेही न्यायालयाने मुलाची याचिका फे टाळताना नमूद के ले.