16 December 2019

News Flash

राम मंदिरासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या – सुब्रमण्यम स्वामी

आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामी (एक्स्प्रेस फोटो-प्रवीण जैन)

आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले. भारत विकास परिषद आयोजित “आधुनिक भारताची परिकल्पना : भविष्यातील मार्ग” या विषयावर व्याख्यानात ते चेंबूर येथे बोलत होते.

डॉ. स्वामी यावेळी म्हणाले की, या देशात संस्कृत आणि देवनागरी लिपी अनिवार्य केली पाहिजे. प्रत्येक भाषेत संस्कृत शब्दच अधिक आहेत. देशातील पाठ्यपुस्तकात देशाचा अभिमानास्पद इतिहास व संस्कृतीच्या ऐवजी मुघल आणि इंग्रजांचे उदात्तीकरण शिकवले जाते. त्यामुळे ही पुस्तकेही लवकरात लवकर बदलली पाहिजेत असेही ते म्हणाले.

आज जग भारतीय संस्कृती स्वीकारते आहे, पण योगाला ख्रिश्चन योगा म्हटले जाते, हे मात्र थांबले पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर्नल या नासाच्या जर्नल मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संस्कृत सर्वाधिक उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे देशात संस्कृत सर्वांना शिकवले पाहिजे असे ते म्हणाले.  श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे काम सुरू करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही असे ते म्हणाले. या जागी पूर्वी मंदिरच होते हे सर्वांनी मान्य केलेलेच आहे, असे सांगून स्वामी पुढे म्हणाले की या जागेचे नरसिंह राव यांनीच राष्ट्रीयीकरण केलेले आहे. आता या जागेवर कोर्टाचा काहीही अधिकार चालत नाही. केवळ मूळ जमीन मालकाला किती भरपाई द्यायची हाच निर्णय कोर्ट देऊ शकते असेही ते म्हणाले. राम मंदिरासाठी पुन्हा भाजपाला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

या देशातील सर्वांचा डीएनए एकाच आहे, त्यामुळे सर्वांनी सर्व भेद विसरून एकत्र राहिले पाहिजे असे आवाहन स्वामी यांनी यावेळी केले. ते म्हणाले की प्राचीन काळात कधीही भेदाभेद असलेला आल्या संस्कृतीत व इतिहासात दिसत नाही. यावेळी मंचावर भारत विकास परिषद कोकण प्रांत पदाधिकारी संजय खेमाणी, चेतना कोरगांवकर, संपत खुरादिया, डॉ.रचयतन शारदा, दिलीप भट, अरुण सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश अय्यर यांनी तर आभार प्रदर्शन टेकचंद गुप्ता यांनी केले. डॉ. स्वामी यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरे झाली. त्याचे सूत्र संचालन डॉ. रतन शारदा यांनी केले.

२०२० पर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे झालेले दिसतील
यावेळी बोलताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की २०२० पर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे झालेले दिसतील. कारण सिंध, बलुच, पाखतून हे पाकिस्तानात राहू इच्छित नाहीत ते लवकरच स्वतंत्र झालेले दिसतील.

First Published on February 11, 2019 8:48 am

Web Title: elect bjp again for ram temple subramanian swamy
Just Now!
X