राज्यातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय; मध्य प्रदेशातील निसटत्या पराभवानंतर खबरदारी

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शंभर-सव्वाशे मतांपासून ते एक-दोन हजार मतांसारख्या अल्प मतांनी भाजपचे सात-आठ उमेदवार पराभूत झाल्याने शिवराजसिंह चौहान यांचे सरकार पडल्याची ठेच लक्षात ठेवत लोकसभा निवडणुकीत एकेक मतदार जोडण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याचा निर्णय भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. त्यासाठी व्यावसायिक वर्ग, समाजघटकनिहाय छोटय़ा-छोटय़ा बैठकांवर भर देणारी आणि मतदारसंघातील प्रत्येक गावातील-भागातील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची यादी घेऊन या प्रचारमोहिमेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. लोकसभा निवडणुकीसंबंधी विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप व अंमलबजावणी याची चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांच्या सभा आणि उमेदवारांच्या प्रचारफेऱ्यांवर आणि समाजमाध्यमांवरील प्रचारावर अवलंबून न राहता प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करण्याचे या बैठकीत ठरले. एकेक मतदार भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे हे लक्षात घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातील.

प्रचारासाठी विविध समित्या व त्यांच्या प्रमुखांची नावेही निश्चित करण्यात आली. जाहीरनामा समितीची जबाबदारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विश्वास पाठक हे व्हिजन डॉक्युमेंटची जबाबदारी पार पाडतील. तर प्रचार व प्रसिद्धी माध्यम समितीचे काम आमदार अतुल भातखळकर यांच्यावर सोपवण्यात आले आहे.

एकनाथ खडसे गैरहजर

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असताना माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गैरहजर होते, तर गिरीश महाजन यांचा गाभा समितीच्या बैठकीत समावेश झाल्याबाबत माध्यमांनी विचारले असता, खडसे काही कामामुळे आले नव्हते. दोन दिवसांपूर्वी मलापण मतदारसंघातील पूर्वनियोजित बैठकांमुळे उपस्थित राहता आले नव्हते, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले. त्याचबरोबर रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांच्या जागेवर अन्य नावांचाही विचार सुरू असल्याने खडसे नाराज असल्याचे वृत्तही मुनगंटीवार यांनी फेटाळले.

विधान परिषद आमदारांवर जबाबदारी

भाजपने लोकसभा निवडणुकीत सारी यंत्रणा झोकून देण्याचे ठरवले असून विधान परिषदेच्या आमदारांवरही त्यांच्या भागातील एक-दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. विधान परिषदेच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. प्रचाराचा समन्वय, संघटनात्मक जबाबदाऱ्या  पार पाडल्या जात आहेत की नाही यावर देखरेख ठेवणे, संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पक्षाकडून हवी असणारी मदत मिळवून देणे आदी कामे सोपवण्यात आली आहेत.