विधानसभा निवडणुकीचा प्रचार टीपेला पोहोचला असून दसऱ्याचा मुहूर्त साधत रविवारी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पदयात्रा, रोड शो, प्रचारफेऱ्यांनी मुंबई दणाणून सोडली होती. दहिसर आणि दिंडोशीमध्ये दसऱ्याचे औचित्य साधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू होता. भल्या पहाटेपासूनच पूजाअर्चामध्ये सहभागी होऊन विविध समाजातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा, तसेच मतदारांवर सोन्याची (आपटय़ाची पाने) उधळण करीत प्रतिस्पध्र्याला गारद करण्याचे प्रयत्न काही विभागांत सुरू होते.
दसऱ्यानिमित्त शुक्रवारी रजा असल्याने हमखास मतदार घरात सापडणार असल्याने मुंबईत सर्वच पक्षांनी प्रचारावर जोर दिला होता. रणरणत्या उन्हामध्ये घामाच्या धारांकडे दुर्लक्ष करीत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेत होते. प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची फोज मतदारसंघातील वेगवेगळ्या विभागांत घरोघरी प्रचारपत्रके वाटत फिरत होती. तर उमेदवार कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन पदयात्रा, प्रचारयात्रा, रोड शोमध्ये व्यस्त होते. प्रचाररथ, जीप, दुचाक्यांचा ताफा विभागा-विभागांतून फिरत होता. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या आमनेसामने येऊ नयेत याची काळजी घेऊन पोलिसांनी प्रत्येक पक्षाला प्रचारमार्ग नेमून दिले होते. त्यामुळे एका रस्त्यावर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा, तर दुसऱ्या ठिकाणी मोदींचा जयजयकार कानावर पडत होता. काही विभागात हाताला साथ देण्याचे आवाहन सुरू होते, तर काही ठिकाणी मनगटावरच्या घडय़ाळाची आठवण करून देत कार्यकर्ते फिरत होते. प्रचाराच्या रणधुमाळीत अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती.