नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे आयकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षण लेखाची प्रत सादर करणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा नोटीस बजावून देखील संबंधित लेखाची प्रत सादर न केलेल्या तब्बल १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांनी केली. या १९१ राजकीय पक्षांच्या यादीत एमआयएमचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही विहित मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहारिया यांनी सांगितले.