राज्य निवडणूक आयुक्तांशी झालेल्या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना पुरविताना चुकीची माहिती देऊन आयुक्तांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात आचारसंहिता सुरू आहे. मुश्रीफ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, ते स्विकारण्यास असमर्थता दाखविली होती. त्यामुळे मुश्रीफ यांनी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. त्यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमाना देतांना, ‘आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन स्वीकारता येत नाही का, असे विचारले असता, ‘कलेक्टर पागल है क्या, फोन दो उसको, मै बात करता हूँ’ असे सहारिया म्हणाल्याचे मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितले. त्याबाबतच्या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे.