करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक १ डिसेंबरला होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पाच मतदारसंघांतील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप हे प्रथमच समोरासमोर येत आहेत.

पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांतील निवडणूक करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या पाचही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींची मुदत १९ जुलैला संपली होती. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पाचही मतदारसंघात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १२ नोव्हेंबपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबरला मतदान तर ३ तारखेला मतमोजणी होईल.

चुरशीची निवडणूक

पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. गेल्या वेळी राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीमुळे पाटील यांना विजय मिळाला होता. या वेळी भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस आहे. राष्ट्रवादीने गतवेळची चूक टाळून सहमती घडविण्यावर भर दिला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी केले होते. त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित सामोरी जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीतच चुरस होण्याची चिन्हे आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातून माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे शिवसेनेच्या वतीने पुन्हा निवडणूक लढविणार आहेत.

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली आहे. नागपूर हा बालेकिल्ला असला तरी पुणे मतदारसंघ कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल. पुणे मतदारसंघ कायम राखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीच पुढाकार घेतला आहे.