घटक संस्थेच्या विरोधामुळे निवडप्रस्ताव नामंजूर

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या एका घटक संस्थेने विरोध दर्शविल्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक न होता ‘निवड’ केली जाण्याचा घटना दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्षाची ‘निवडणूक की निवड’ या कळीच्या मुद्य्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. महामंडळाच्या ४ जून रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ‘निवडणुकीऐवजी निवड’असा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

महामंडळ घटना दुरुस्ती समितीत या घटक संस्थेचाही समावेश असून ‘निवड’ करण्याचा प्रस्ताव उपसमितीने तयार केला त्या बैठकीलाही या घटक संस्थेचा प्रतिनिधी अनुपस्थित होता. घटना दुरुस्ती समिती ही महामंडळाचे प्रातिनिधीक स्वरुप आहे. महामंडळाच्या सर्व घटक संस्थांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा आणि महामंडळाच्या उपाध्यक्षांचा समाविष्ट व संलग्न संस्थांचा प्रतिनिधी म्हणून घटना दुरुस्ती समितीत सहभाग असतो.

उपसमितीकडून आलेल्या प्रस्तावांना अंतिम स्वरूप देऊन घटना दुरुस्ती समिती हे प्रस्ताव महामंडळापुढे सादर करते. महामंडळाच्या १९ सदस्यांपैकी २/३ सदस्यांची घटना दुरुस्तीला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

‘निवडणूक न घेता ‘निवड’ केली जाण्याच्या प्रस्तावास घटना दुरुस्ती समितीच्या बैठकीत एकमुखाने मान्यता देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महामंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता.

कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साहित्यविषयक काम करणाऱ्या दोन साहित्य संस्था तसेच अन्य साहित्य संस्थांनाही महामंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी ‘सहयोगी संस्था’ अशी व्यवस्था करण्याचा प्रस्तावही घटना दुरुस्ती समितीने तयार केला आहे. मात्र विशेष सर्वसाधारण सभेत या प्रस्तावालाही उपरोक्त घटक संस्थेने विरोध केला, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.

घटना दुरुस्ती संदर्भातील विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज अद्याप पूर्ण झालेले नसून सभा स्थगित ठेवण्यात आली आहे. सभेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर अधिक भाष्य करता येईल. – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ