|| उमाकांत देशपांडे

कुर्ला, वांद्रे ते विलेपार्ले असा संमिश्र वस्तीचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जायचा. गेल्या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी धाडस केले आणि मोदी लाटेत त्या निवडून आल्या. काँग्रेसने पुन्हा एकदा प्रिया दत्त यांनाच रिंगणात उतरविल्याने चुरस वाढली असून, महाजन आणि दत्त या दोघींमधील लढतीत यंदा कोण बाजी मारते याची उत्सुकता असेल.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचा काही भाग पूर्वी वायव्य मुंबई मतदारसंघात येत असे. सुनील दत्त यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या प्रिया दत्त या दोनदा निवडून आल्या. मतदारसंघाची रचना लक्षात घेता हा मतदारसंघ तसा काँग्रेसला अनुकूल, पण गेल्या निवडणुकीत चित्र बदलले. मोदी लाटेत सारेच बालेकिल्ले खालसा झाले व त्यात या मतदारसंघाचा समावेश होता. पूनम महाजन या निवडून आल्या. प्रमोद महाजन यांची कन्या म्हणून त्यांना वेगळे वलय होते. निवडून आल्यावर त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. यंदा पूनम महाजन यांचा मतदारसंघ बदलणार अशी सुरुवातीला चर्चा होती, पण त्यांनाच पुन्हा या मतदारसंघातून संधी दिली जाणार आहे. यामुळे पूनम महाजन आणि प्रिया दत्त या दोन माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कन्यांमध्येच सामना रंगणार आहे.

गेल्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा १ लाख ८७ हजारांहून अधिक मतांनी पराभव करून पूनम महाजन यांनी मोदी यांच्या लाटेत बाजी मारली. त्यावेळी भाजपची पाळेमुळे या मतदारसंघात रुजलेली नव्हती. मात्र त्यानंतर झालेली विधानसभा व महापालिका निवडणुकीत संघटनेची मतदान केंद्र पातळीपर्यंत नीट बांधणी करण्यात आली. मोदी लाटेचा प्रभाव या वेळी फारसा राहिलेला नाही. पण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान त्यांच्या मतदारसंघात असून महाजन-ठाकरे घराण्याच्या कौटुंबिक संबंधांमुळे शिवसेना-भाजप युतीचा लाभ त्यांना मिळू शकेल.

या मतदारसंघात वांद्रे-कुला संकुल, वांद्रे, पवई व अन्य ठिकाणी उच्चभ्रू वस्तीही आहे आणि वांद्रे, कालिना, चांदिवली, कुर्ला आदी परिसरात झोपडपट्टय़ांचे साम्राज्यही आहे. वांद्रे येथील मोठी शासकीय वसाहत, कालिना येथे एअर इंडिया कॉलनी, तर कुर्ला व अन्य ठिकाणी शासनाकडून कब्जेहक्काने दिल्या गेलेल्या जमिनींवर बांधण्यात आलेल्या अनेक मोठय़ा सोसायटय़ाही आहेत. बीकेसी संकुलात प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिक आस्थापना आहेत. संमिश्र स्वरूपाच्या या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मराठी भाषिक, पाच लाखांच्या आसपास मुस्लीम, सुमारे दोन लाख ७० हजार उत्तर भारतीय, गुजराती/राजस्थानी सुमारे दीड लाख, ख्रिश्चन सुमारे एक लाख १० हजार आणि दक्षिण भारतीय व अन्य जातीधर्माचे उर्वरित मतदार आहेत. अयोध्येतील राममंदिर, मुस्लीम समाजात तोंडी तलाक देण्याविरोधातील कायदा आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांमुळे मुस्लीम मतांचे धुव्रीकरण होण्याची शक्यता आहे. आप, सपा, बसपा व अन्य प्रबळ उमेदवार उभे न राहिल्यास काँग्रेसची मतविभागणी होणार नाही व ती महाजन यांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अन्य धर्मीय व भाषिकांचा पाठिंबा मिळविण्यावर दत्त यांचा भर राहील.

महाजन यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजप युती झाल्याने आणि मतदारसंघ बांधणी व पाच आमदारांचे पाठबळ याचा त्यांना लाभ मिळू शकेल. विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न. निवडणुकीआधी घाईघाईने काही रहिवाशांना कुर्ला येथे एचडीआयएलने बांधलेल्या १८ हजारपैकी घरांचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्याने आणि तीन महिन्यांमध्ये उर्वरित घरांसाठी लॉटरी काढून घरांचे वाटप करण्याचे जाहीर केले. कुर्ला येथील शिवसृष्टीसह कब्जेहक्काने शासनाने दिलेल्या जमिनींवर बांधलेल्या सहकारी सोसायटय़ांना या जमिनी मालकीहक्काने देताना २५ ऐवजी पाच टक्के प्रीमियम आकारण्याची मागणी होती. महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने हा प्रीमियम १० टक्के करण्याचा निर्णय घेऊन रहिवाशांना दिलासा दिला आहे. या बाबींचा राजकीय लाभ महाजन यांना कितपत मिळतो, हे महत्त्वाचे असणार आहे. मात्र विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यास अवधी लागणार आहे. संरक्षण दलाच्या जमिनींवरील इमारतींचा प्रश्न, विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या इमारतींना जादा चटईक्षेत्र निर्देशांक देऊन पुनर्बाधणी करणे, यासह काही प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील तरुण नेत्यांच्या यादीत महाजन यांचा समावेश केला. राज्य ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डा‘च्या अध्यक्षा आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारणीसाठी राज्य सरकारच्या विशेष कृती दलाच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. कोल्ड प्लेसारखा जगविख्यात पॉपसंगीत कार्यक्रम, ब्रिटन येथील एलिफंट परेडच्या कलाकृतींचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

प्रिया दत्त या गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघात फारशा सक्रिय नव्हत्या. यातच पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले होते. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी कृपाशंकर सिंग, बाबा सिद्दिकी, नसिम खान हे पक्षांतर्गत विरोधक  किती साथ देतात हे प्रिया दत्त यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांना घरे, संरक्षण दलाच्या जमिनींवरील रहिवाशांच्या कायमस्वरूपी निवासासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया, कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करताना २५ ऐवजी आता १० टक्के प्रीमियम, हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आतापर्यंत १४२८ इतक्या विक्रमी सार्वजनिक शौचालयांची बांधणी, यासह अनेक कामे गेल्या पाच वर्षांत केली आहेत. त्याचबरोबर मंदिरांचे जीर्णोद्धार, बुद्धविहार, सार्वजनिक सभागृहांची बांधणी, नूतनीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण यासह अनेक गोष्टी केल्या आहेत.    –  पूनम महाजन, भाजप खासदार

मतदारसंघातील प्रश्न पाच वर्षांत तसेच राहिले असून निवडणुकीआधी घाईघाईत विमानतळ परिसरातील १० ते १२ झोपडपट्टीवासीयांना घरे देणे, ही धूळफेक आहे. कब्जे हक्काने दिलेल्या शासकीय जमिनी मालकी हक्काने देताना प्रीमियम आणखी कमी करणे आवश्यक असून अनेक अटी घालून या रहिवाशांची फसवणूक करण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, संरक्षण खात्याच्या जमिनींवरील इमारती, फनेल झोन क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास यासह अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करीन. गेल्या पाच वर्षांत मी राजकीय क्षेत्रात कमी वावरले असले तरी सामाजिक कार्य सुरू ठेवले होते व तेच महत्त्वाचे आहे.    –  प्रिया दत्त, काँग्रेसच्या माजी खासदार