आतापर्यंत आघाडी किंवा युतीला एकहाती यश

लोकसभा निवडणुकीत मुंबईचा कौल युती किंवा आघाडी यापैकी एकाला मिळतो, हा आजवरचा अनुभव लक्षात घेता यंदा मुंबईकर भाजप-शिवसेना युती की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे उभे राहणार, याची उत्सुकता आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने मुंबईतील सहाही जागा जिंकल्या होत्या. १९९८ मध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. १९९९ मध्ये मुंबईत युतीला पाच जागा मिळाल्या होत्या. २००४ आणि २००९च्या निवडणुकांमध्ये मुंबईत काँग्रेस आघाडीचे वर्चस्व होते. मुंबईचा कौल युती किंवा आघाडीला एकतर्फी मिळतो हा अनुभव आहे.

आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली आहे. युतीत शिवसेना आणि भाजप प्रत्येकी तीन जागा लढवीत असून, आघाडीत काँग्रेस पाच तर राष्ट्रवादी एक जागा लढवीत आहे. सहाही जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस आघाडीही जास्तीत जास्त जागाजिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गेल्या पाच वर्षांत मुंबईत झालेला विकास आणि पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामे लक्षात घेता मुंबईकर पुन्हा भाजप आणि शिवसेनेलाच कौल देतील, असा भाजपला विश्वास आहे. युती झाल्याने मतांचे विभाजन टाळले जाईल व त्याचा भाजप आणि शिवसेना उभयतांना फायदा होईल. काँग्रेस नेते मात्र चाचपडत आहे. आधी गटबाजीचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होते. आता मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झाल्याने परस्परांच्या विरोधात कारवाया थांबतील एवढाच काँग्रेसच्या उमेदवारांना दिलासा आहे.

मुंबईत उत्तर भारतीय, अल्पसंख्याक व अन्य भाषकांची मते आधी काँग्रेसला मिळत असत. या मतांच्या आधारे काँग्रेसचे विजयाचे गणित जुळत असे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळले. गुजराथी-मारवाडी-जैन मतदारांची एकगठ्ठा मते भाजपला मिळू लागली. मराठी मतदारांना मोदी यांच्यामुळे भाजपचे आकर्षण आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतल्यास काँग्रेसला अल्पसंख्याक आणि दलित मतांवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून राहावे लागेल. काँग्रेसला आजच्या घडीला तरी वातावरण तेवढे पोषक नाही, असे काँग्रेसचे नेते खासगीत मान्य करतात. मुंबईत एप्रिल अखेर मतदान असल्याने वातावरण बदलण्यात किती यश येते यावरही बरेच अवलंबून असेल.

मुंबईतील सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये २०१४मध्ये लढत झालेल्या उमेदवारांमध्येच पुन्हा लढती होणार आहेत.

दक्षिण मुंबई

शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. भाजपची ताकद, शिवसेनेचे संघटन हे युतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. मतदारसंघातील अल्पसंख्याक मते तसेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सावंत यांच्याऐवजी देवरा यांना प्राधान्य मिळू शकते. चुरशीची लढत अपेक्षित आहे.

दक्षिण मध्य मुंबई

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यातच पुन्हा लढत होणार आहे. मतदारसंघातील दलित, अल्पसंख्याक मतांवर काँग्रेसचा भर आहे. दादर-माहीमसह शिवसेनेचा बालेकिल्ला या मतदारसंघात आहे. शेवाळे यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असली तरी त्याचा कितपत परिणाम होतो यावरही बरेच अवलंबून आहे.

उत्तर पश्चिम मुंबई

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात लढत होणार आहे. निरुपम रिंगणात असल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे संघटन आणि भाजपची ताकद याआधारे पुन्हा विजय प्राप्त करण्याबाबत कीर्तिकर आशावादी आहेत. पण निरुपम यांच्यामुळे चुरस वाढली आहे.

उत्तर मुंबई

भाजपला एकतर्फी वाटणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसने चित्रपट अभिनेती उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्यासाठी निवडणूक अगदीच सोपी राहिलेली नाही. २००४ मध्ये याच मतदारसंघात राम नाईक यांचा चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी पराभव केला होता.

उत्तर मध्य मुंबई

भाजपच्या खासदार पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यातच यंदाही लढत होणार आहे. प्रिया दत्त गेली पाच वर्षे जवळपास मतदारसंघात सक्रिय नव्हत्या. हा प्रचारात मुद्दा होऊ शकतो. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या आधारे यश मिळेल असा पूनम महाजन यांना विश्वास वाटतो.

ईशान्य मुंबई

किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप झालेला नाही. सोमय्या किंवा अन्य कोणी उमेदवार असला तरी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यासमोर आव्हान असेल. कागदावर तरी भाजपसाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे.