भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी ट्विटरवरून भाजपचे नाव न घेता टीका केली. गुजरातमधील निवडणुकांच्या आधी एका पक्षाकडून जीएसटीत बदल करण्यात आले. मात्र, त्याचा जनतेशी आणि देशाशी काहीही संबंध नाही. या पक्षाला फक्त निवडणुकीची काळजी असल्याचे आदित्य यांनी म्हटलेय.

जीएसटीच्या अंमलबजावणीपासून राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसने अंमलबजावणीतील ढिसाळपणा आणि त्रुटींचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत २८ टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तुंवरील कर १८ टक्क्यांपर्यत कमी करण्यात आला होता. तसेच व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी काही सवलतही देण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारने ही सगळी पावले गुजरातच्या आगामी निवडणुकीच्यादृष्टीने उचलल्याचा आरोप आदित्य यांनी केला. गुजरात निवडणुकीच्या आधीही लोकांना जीएसटीचा त्रास होत होता. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आता निवडणुकीत त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर लगेच जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे या पक्षाचा ‘नेशन फर्स्ट’चा मुखवटा फाटला आहे. त्यांच्यासाठी ‘इलेक्शन फर्स्ट’ आहे, हे दिसून आल्याचे आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारात शिवसेनेचे राज्यमंत्री?

भाजपवर कुरघोडी करण्याकरिताच शिवसेना गुजरात विधानसभा निवडणुकीत ५० पेक्षा अधिक जागा लढवत आहे. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने काही जागांवर उमेदवार उभे केले होते. पण पक्षाच्या उमेदवारांची अनामतही वाचली नव्हती. भाजप आणि शिवसेनेत सध्या कमालीची कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला अपशकून करण्याच्या उद्देशानेच मतविभाजन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.