करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने अशा ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यात गेल्या वर्षी विविध कारणांमुळे १६ हजार ३७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून यावर्षी डिसेंबर अखेर ३० हजार ५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे-नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने, सूत गिरण्या अशा अ वर्ग दर्जाच्या ११६ संस्था, तर नागरी सहकारी बँका, सहकारी सोसायटी, सेवा सोसायटी अशा ब वर्गाच्या १३ हजार तसेच गृहनिर्माण संस्था, दूध सोसायटी अशा क वर्गातील १३ हजार आणि ड वर्गातील २१ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.