मुंबई : निवडणूक रणनीतीत निष्णात मानले जाणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी शुक्र वारी सविस्तर चर्चा केल्याने आगामी राजकीय डावपेचांची पवारांनी चाचपणी के ल्याचे मानले जाते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी तर तमिळनाडूतील द्रमुकच्या विजयात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. २०१४ मधील मोदी यांचा विजय किंवा विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांचे आडाखे आणि नियोजन उपयोगी पडले होते. राज्य विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला सल्ला दिला होता आणि आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना पेचात टाकणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतल्याने  वेगवेगळे तर्क  लढविले जाऊ लागले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजप चांगली कामगिरी करणार नाही, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी गेल्या डिसेंबरमध्ये वर्तविले होते. त्यांचे भाकीत खरे ठरले. निवडणूक निकालानंतर प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून यापुढे काम करण्यास रस नसल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीच्या सारीपाटावर सारी प्यादी हलविण्यात माहीर असलेल्या शरद पवार यांनी किशोर यांच्याशी चर्चा के ल्याने राष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली.

महत्त्व का?

बिगर भाजप आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा राजधानीत सूर आहे. या पाश्र्वाभूमीवर शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी के लेली सुमारे तीन तास चर्चा महत्त्वाची ठरते. राज्याच्या निवडणूक आखाड्यातील बारकावे अवगत असलेल्या शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या यशासाठी प्रशांत किशोर यांच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. परंतु राष्ट्रीय राजकारणातील आगामी रणनीतीबाबत पवार यांनी किशोर यांच्याशी सल्लामसलत के ली असावी, असे मानले जाते.

तिसऱ्या आघाडीची चाचपणी…

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने यात सहभागी होण्याचे टाळल्यास बिगर भाजप व बिगर काँग्रेसची तिसऱ्या आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, देवेगौडा, अकाली दल अशा विविध पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.