News Flash

हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची परंपरा यंदाही?

 मुख्यमंत्र्यांची खुर्ची नागपूर अधिवेशनाच्या काळातच अस्थिर झाल्याची उदाहरणे आहेत.

हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची विधिमंडळात मधल्या काळात परंपराच पडली होती. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला फटाके लावण्याची सुरुवात याच काळात मुख्यत्वे होत असे आणि राजकीय हिशेबही याच अधिवेशनात चुकते केले जात असत. भाजपच्या पाच वर्षांच्या काळात हिवाळी अधिवेशने सुरळीतरीत्या पार पडली होती. पण महाआघाडी सरकारसमोर प्रबळ अशा विरोधी भाजपचे आव्हान असेल. येत्या सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन एकच आठवडय़ाचे असले तरी त्यात गोंधळ होण्याची चिन्हे जास्त दिसतात.

नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची तरतूद होती. साधारणपणे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले होते आणि अतिवृष्टीमुळे एक दिवस पार विचका उडाला होता. विधान भवनाच्या आवारात पाणीच पाणी झाले आणि या पाण्यात दारूच्या बाटल्या वाहत आल्या होत्या. हिवाळी अधिवेशनाचा उल्लेख ‘हुरडा पार्टी’ असाही केला जात असे. नागपूरच्या गुलाबी थंडीत हुरडा पार्टीचे पूर्वी आयोजन केले जात असे. अजूनही हुरडा पाटर्य़ा केल्या जातात.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची नागपूर अधिवेशनाच्या काळातच अस्थिर झाल्याची उदाहरणे आहेत. बॅ. ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांची खुर्ची नागपूर अधिवेशनानंतर थोडय़ाच दिवसात गेली होती. बाबासाहेब भोसले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात विधान भवनाच्या आवारातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत न भूतो न भविष्यति असा गोंधळ झाला होता. बाबासाहेबांना बैठकीतूनच पळ काढावा लागला होता. या गोंधळाचे वर्णन बाबासाहेब भोसले यांनी ‘भाषा बंडाची, कृती गुंडाची आणि वृत्ती षंढाची’ असे केले होते. स्वपक्षीय आमदारांवर बाबासाहेबांनी कोरडे ओढल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती. पण बाबासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहिमा काँग्रेस सरकारच्या काळात नागपूरमध्येच झाल्या. शरद पवार यांच्या विरोधात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव आदिक आदींनी बंड केले होते. या बंडाची सुरुवात हिवाळी अधिवेशनातच झाली होती. राजीव गांधी यांनी पवारांना अभय दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनाच्या काळातच मोहिमा राबविण्यात आल्याने अनेकदा हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्र्यांसाठी आव्हान मानले जायचे.

महाआघाडीची कसोटी

सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांसह सात जणांचेच मंत्रिमंडळ आहे. शपथविधी होऊन दोन आठवडे होत आले तरी मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. परिणामी सारेच मंत्री बिनखात्याचे आहेत. एकूणच सारे अनिश्चिततेचे वातावरण दिसते. अधिवेशनासाठी मंत्र्यांकडे खात्यांची जबाबदारी सोपविली जाणार आहे. पण एकाच वेळी किती खात्यांचा भार सोसायचा असाही मंत्र्यांना प्रश्न पडला आहे. खातेवाटप झाल्यास त्या खात्याचा अभ्यास करून भूमिका मांडता येते. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला १५ खाती येणार असल्यास दोनच मंत्र्यांना ती विभागून घ्यावी लागतील. एकूणच सारा गोंधळ आहे. दुसऱ्या बाजूला १०५ आमदार असलेला भाजप हा आक्रमक विरोधी पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याची संधी सोडणार नाहीत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी आदी विषयांवरून भाजप सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता दिसते. उद्धव ठाकरे यांना विधिमंडळ कामकाजाचा अनुभव नाही. या तुलनेत छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे राष्ट्रवादी व काँग्रेसचे मंत्री अनुभवी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:28 am

Web Title: election vidhimandal cm politics government bjp akp 94
Next Stories
1 आर्थिक मदत नसतानाही ‘सारंगखेडा महोत्सव’ धडाक्यात सुरू!
2 १४ व १५ डिसेंबरला ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’
3 धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपये अनुदान
Just Now!
X