पर्यावरणस्नेही प्रवास; सध्या मुंबई ते पुणेसह कमी अंतरावर

सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवासासोबत इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळ विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ा आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या विजेवर धावणाऱ्या १०० वातानुकूलित बसगाडय़ा मुंबई ते पुणे अशा कमी अंतरासाठी चालवण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

केंद्र सरकारनेही विजेवर धावणाऱ्या बसना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी विजेवर धावणाऱ्या बस एसटीला फायदेशीर ठरतील आणि या बस चालवण्याचा विचार करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार भाडेतत्त्वावरील १०० वातानुकूलित बस सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. यासाठी निविदा काढली आहे. या बस साधारण २५० कि.लो.मीटर अंतरापर्यंत चालविण्याचा विचार महामंडळाने केला आहे.

खर्चात बचत..

एसटी महामंडळाकडे १८ हजारांहून अधिक बस असून त्या डिझेलवर धावतात. या बसच्या इंधनासाठी हजारो कोटी रुपये खर्च येतो. विजेवर धावणाऱ्या बससाठी प्रतिकिमीला साधारण ६४ पैसे खर्च येतो आणि एसटीच्या ताफ्यातील प्रत्येक बसच्या इंधनासाठी प्रति कि.लो.मीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येतो. विजेवर धावणाऱ्या बसमुळे इंधन खर्च कमी होणार असल्याने या बस चालवण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला.

सध्या कमी अंतरासाठीच..

विजेवरील बस ३०० ते ४०० किलोमीटपर्यंत धावू शकतात. विजेवरील बसना चार्जिगची गरज असते. मात्र ग्रामीण भागात विजेचा प्रश्न भेडसावत असल्याने चार्जिग सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने लांब पल्लय़ाच्या मार्गावर या बस न चालवण्याचा सध्या निर्णय घेण्यात आला आहे. जी कंपनी विजेवर धावणाऱ्या बस उपलब्ध करून देणार तीच कंपनी चार्जिगची सुविधा देणार आहे. त्यामुळे प्रथम मुंबई ते पुणेसह अन्य काही कमी अंतरावर या बस चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

भाडेतत्त्वावर १०० विजेवरील वातानुकूलित बस लवकरच दाखल केल्या जाणार आहेत. सध्या एसटीकडे डिझेलवरील बस असून त्यामुळे इंधन खर्च अधिक होतो. विजेवरील बसमुळे इंधनावरील खर्च वाचेल.     – रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ