मुंबईमधील चाळी, गृहनिर्माण सोसायटय़ांमधील घरांतील विद्युत उपकरणे आणि वाहिन्यांची नियमितपणे तपासणी करण्याची यंत्रणा विद्युतपुरवठा कंपन्यांकडे आहे. मात्र ग्राहकांनी मागणी केली तरच त्यांच्या घरातील विद्युत सुरक्षेची तपासणी केली जाते. शॉर्टसर्किटमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी घरातील वीज यंत्रणेच्या सुरक्षेची तपासणी करून घेण्यात मुंबईकर उदासीन असल्यानेच शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकाम ऑडिटप्रमाणेच ‘विद्युत ऑडिट’ही करून घेण्याबाबत ग्राहकांनी जागरूक असले पाहिजे, असे मत पालिकेमधील उच्चाधिकारी व्यक्त करीत आहेत.

मुंबईमध्ये बेस्ट उपक्रम, रिलायन्स एनर्जी कंपनी, टाटा वीज कंपनी आणि महावितरण यांच्यामार्फत मुंबईकरांना वीजपुरवठा केला जातो. शहरामध्ये पुनर्विकासात एखादी इमारत उभी राहिल्यानंतर, सक्षम यंत्रणांनी सुरक्षा दाखला दिल्यानंतरच बेस्ट उपक्रमाकडून वीजपुरवठा सुरू केला जातो. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील सदनिकांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विजेचा वापर किंवा बेदरकारपणे वीज यंत्रणा वापरली जाते. परिणामी शॉर्टसर्किटसारख्या घटना घडतात, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नव्या इमारतींमध्ये वीज मीटर देण्यापूर्वी वीज यंत्रणा तपासण्याची यंत्रणा वीज कंपन्यांकडे आहे. जुन्या इमारतींतील ग्राहकांनी तक्रार अथवा मागणी केल्यानंतर संबंधित इमारतीमधील घरांतील विद्युत सुरक्षेची तपासणी केली जाते. वीज कंपन्या स्वत:हून नियमितपणे तशी तपासणी करीत नाहीत. त्यामुळे घराघरांमध्ये वर्षांनुवर्षे बदलण्यात न आलेल्या वायर्स आणि उपकरणे धोकादायक बनू लागली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ओल्या भिंतीला स्पर्श झाल्यास विजेचा झटका बसणे अथवा उंदराने कुरतडलेल्या वायर्समुळे शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडतात. काही वेळा निकृष्ट दर्जाची वायर अथवा उपकरणेही आगीच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत.

प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्यासाठी वीज कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे मुंबईमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने तज्ज्ञांमार्फत प्रत्येक इमारतीची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून त्याचा अहवाल पालिकेला सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईमधील बहुसंख्य इमारत मालक आणि सोसायटय़ांनी इमारतींची संरचनात्मक तपासणी करून पालिकेला अहवाल सादर केला आहे. त्याच धर्तीवर शासनमान्य तज्ज्ञ अथवा संस्थांमार्फत इमारतीमधील घराघरांतील विद्युत सुरक्षेची तपासणी करून त्याचा अहवाल वीज कंपन्यांना सादर करण्याची योजना आखण्याची गरज आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.

टोलेजंग इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा तपासण्याचे काम अग्निशमन दलावर सोपविण्यात आले आहे; परंतु आगीला कारणीभूत ठरणारे शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून विद्युत सुरक्षा तपासणीची यंत्रणा अग्निशमन दलाकडे नाही. शॉर्टसर्किट झालेल्या सोसायटीवर नोटीस बजावून विद्युत सुरक्षेची तपासणी करून घेण्याची सूचना अग्निशमन दलाकडून केली जाते. त्यानुसार संबंधित सोसायटी शासनमान्य संस्थेमार्फत तपासणी करून घेते. मात्र वीज कंपनीकडे अर्ज करून घरातील विद्युत सुरक्षेची नियमित तपासणी करून घेण्यात मुंबईकर उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे.

घरातील विद्युत सुरक्षेची वीज कंपन्यांमार्फत अथवा अन्य काही पर्यायांद्वारे नियमित तपासणी करता येईल का, याची पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त