लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कर्मचाऱ्यांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त असल्यामुळे वीजदेयकांचे वेळापत्रक कोलमडून बेस्टच्या विजेची देयके  अंतिम तारखेनंतर ग्राहकांच्या हातात पडत आहेत. विद्युत विभागातील प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ग्राहकांना विनाकारण २० ते ५० रुपयांचा भरुदड सहन करावा लागत आहे.

बेस्ट उपक्रमाचा आर्थिक डोलारा सावरणाऱ्या विद्युत विभागालाही घरघर लागली आहे. बेस्टचे विद्युतचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना सेवा देण्यास प्रशासन कमी पडत आहे. मीटर वाचन, बिल तयार करणे आणि बिल वितरण असे बेस्टचे वेळापत्रक ठरलेले असते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे वेळापत्रक कोलमडले आहे.

बिल भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर बिले वितरणासाठी पाठवली जातात. उशिरा मिळालेल्या बिलांमुळे वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र विनाकारण जादा पैसे भरावे लागत आहेत.

बेस्टच्या विद्युत विभागात गेल्या १० वर्षांत भरती झालेली नाही. मात्र विद्युत ग्राहकांची आणि मीटरची संख्या वाढली आहे. दुसरीकडे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. एखादा कर्मचारी रजेवर गेला तरी इतरांच्या कामावर परिणाम होतो.

देयक वेळेवर पोहोचत नसल्यामुळे ग्राहक आणि वीजदेयक भरणा के ंद्रावरील कर्मचारी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे या विभागाचे महत्त्व लक्षात घेऊन रिक्त पदे भरावी व मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याची मागणी कामगारांमधून होऊ लागली आहे. विजेचे देयक ऑनलाइन देण्याची व भरण्याची लोकांना सवय लागत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था अशीच राहिल्यास ग्राहकांचे व बेस्टचे नुकसान होण्याची भीती व्यक्त के ली जात आहे.

१.२५ टक्के  जादाचा भरुदड

विजेचे देयक अंतिम मुदतीच्या आत भरले नाही तर एकू ण बिलावर १.२५ टक्के  जादा आकारणी के ली जाते. २० ते ५० रुपयांनी देयक वाढते. त्यामुळे ग्राहकांची चूक नसताना ही रक्कम ग्राहकांना भरावी लागते आहे. अनेक ग्राहक न बघताच ही रक्कम भरतात, तर जे ग्राहक याविरुद्ध आवाज उठवतात, त्यांना आपल्या पैशांसाठी खेटे घालावे लागतात.

काम असे चालते..

मुंबईतील विद्युतपुरवठय़ाच्या या जाळ्याचे १८ विभाग के लेले आहेत. त्या प्रत्येक  विभागाचे मीटर वाचन करण्याचे आणि बिल वितरण करण्याचे वेळापत्रक ठरलेले असते. बिल वितरण करणाऱ्यांना दिवसाला ४०० ते ५०० बिले वितरित करावी लागतात. झोपडपट्टीत जाणे, इमारतीत जिने चढणे यांमुळे हे लक्ष्य गाठताना क र्मचाऱ्यांनाही नाकीनऊ येतात.