उमाकांत देशपांडे

यंदा चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्रासाठीच्या वीज मागणीत वाढ झाली असून सध्या महावितरणची विजेची मागणी १९ हजार ५०० मेगावॉटवर पोचली आहे. ही मागणी वाढतच असून मार्च-एप्रिलमध्ये उच्चांकी वीज मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात भारनियमन करावे लागू नये आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कंपनी प्रयत्न करणार आहे.

राज्यात सुमारे ४५ लाखांहून अधिक कृषीपंप असून त्यासाठी किमान चार ते साडेचार हजार मेगावॉटहून अधिक वीज द्यावी लागत आहे. सध्या कृषीपंपांसाठी आठ तास वीज पुरविण्यात येत आहे.  पाणी उपलब्ध असल्याने रब्बीसाठी उपसा होत असून विजेची मागणी वाढत आहे.

गेल्या एक-दोन वर्षांतील डिसेंबर महिन्यातील कमाल वीज मागणीच्या तुलनेत विजेची मागणी हजार मेगावॉटहून अधिक वाढली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये साडेतीन लाख कृषीपंपांची भर पडली आहे. सध्या पुरेशी वीज उपलब्ध आहे. पण वीज मागणीचा वाढता आलेख पाहता रब्बीचा हंगाम आणि मार्च-एप्रिलमधील विजेची मागणी लक्षात घेता त्या वेळी वीजमागणीचा नवीन उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासगी वीज कंपन्यांशी लहान मुदतीचे करार करून पुरेशा विजेची तरतूद करण्याचे महावितरणचे प्रयत्न असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणाले, यंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने कृषी क्षेत्रासाठीची वीज मागणी वाढत असून मार्च-एप्रिलमध्ये कमाल वीजमागणी २३ हजार मेगावॉटचा नवीन उच्चांक नोंदविण्याची शक्यता आहे.