पालिकेचे आरोग्य खाते चिराबाजार येथील चंदनवाडी विद्युतदाहिनीची दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी विद्युतदाहिनी २ मे ते ९ जुलै या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. ही विद्युतदाहिनी १० जुलैपासून शवदहनासाठी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
चंदनवाडी विद्युतदाहिनी स्मशानभूमीतील केवळ एकच विद्युतदाहिनी कार्यान्वित होती. त्यामुळे काही वेळा अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत होते.
याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती. आता या विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी ही विद्युतदाहिनी २ मे ते ९ जुलै या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पार्थिव दहनासाठी चंदनवाडी स्मशानभूमी, बाणगंगा विद्युतदाहिनी (गॅस), रे रोड विद्युतदाहिनी, वरळी विद्युतदाहिनी, भोईवाडा विद्युतदाहिनी येथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याचे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.