22 October 2019

News Flash

राज्यावर वीज कडाडणार!

१ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

१ एप्रिलपासून सरासरी सहा टक्के दरवाढ

राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीजदर आता १ एप्रिल २०१९ पासून पुन्हा वाढणार आहेत. घरगुती वीजग्राहकांना सरासरी सहा टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ही वीजदरवाढ होत असल्याने त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

राज्य वीज आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले होते. तर बेस्टचे वीजदर कमी झाले होते. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

महावितरणच्या दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा वीजदर ५.३० रुपये प्रति युनिट होता. आता या ग्राहकांची वीज १६ पैशांनी महाग होऊन त्यांना ५.४६ प्रति युनिट मोजावे लागतील. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज युनिटमागे २४ पैशांनी महाग होईल. ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांबरोबरच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. तो ८० रुपयांवरून ९० रुपये होणार आहे. इतकेच नव्हे तर महावितरणची १२ हजार ३८२ कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली असून, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कधीही ती लागू होण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या अदानी कंपनीच्या वीजदरांवरून मोठा गदारोळ झाला होता. आता एप्रिलपासून १०० युनिटपर्यंतच्या वीजग्राहकांचा दर २७ पैशांनी वाढून ४.७७ रुपये प्रति युनिट होणार आहे. ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांचा दर ७.६४ रुपयांवरून २६ पैशांनी महाग होऊन ७.९० रुपये होईल. ३०० ते ५०० युनिट वीज वापरणाऱ्यांना ९.०८ रुपयांऐवजी ९.२९ रुपये मोजावे लागतील.

‘बेस्ट’ची वीज स्वस्त

पूर्वी ‘बेस्ट’च्या बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी विद्युत ग्राहकांवर बोजा टाकला जात होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे परिवहन तोटा आकाराची वसूल केलेली रक्कम परत केली जात आहे. त्यामुळे आता ‘बेस्ट’चे वीजदर सरासरी तीन टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत.

नवे दर असे.. महावितरणच्या दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचा वीजदर १६ पैशांनी महाग झाला आहे. त्यांना ५.४६ रुपये प्रति युनिट मोजावे लागतील. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज युनिटमागे २४ पैशांनी तर ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे.

First Published on March 27, 2019 1:35 am

Web Title: electricity rate increase average six percent from 1st april