News Flash

गणेशोत्सव मंडळांच्या वीजचोरीला चाप

एकीकडे भक्तांकडून वर्गणी गोळा करतानाच दुसरीकडे विविध मार्गानी अनधिकृतपणे कामे करणाऱ्या काही गणेशोत्सव मंडळांना लगाम घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत वीज कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. वीजजोडणी देणारे

एकीकडे भक्तांकडून वर्गणी गोळा करतानाच दुसरीकडे विविध मार्गानी अनधिकृतपणे कामे करणाऱ्या काही गणेशोत्सव मंडळांना लगाम घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत वीज कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. वीजजोडणी देणारे जंक्शन बॉक्स सीलबंद करण्याचा नामी उपाय वीज कंपन्यांना सापडल्याने या वर्षी अनधिकृत जोडण्या आणि त्यातून उद्भवणारा शॉर्टसर्किटचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.
चोरी करण्यासाठी गुन्हेगार विविध मार्ग शोधून काढतात आणि त्यांना थोपवण्यासाठी पोलीस नामी शक्कल लढवतात. गणेशोत्सव मंडळांकडून होणारी वीजचोरी आणि त्यांना अडवून शुल्क वसूल करणाऱ्या विद्युत कंपन्या यांच्यातही गेली अनेक वष्रे ही रस्सीखेच सुरू आहे. या वर्षी यात आणखी एका उपायाची भर पडली आहे. वीजजोडणीचे बॉक्सच सीलबंद करण्याची योजना रिलायन्सकडून उपनगरांतील अनेक ठिकाणी अमलात आणली जात आहे. दक्षिण मुंबईत बेस्टकडून विद्युत पुरवठा केला जातो. गेल्या पाच वर्षांत गणेशोत्सवांकडून मागणी करण्यात येणाऱ्या मीटरसंख्येत एक हजारावरून तेराशेपर्यंत वाढ झाली आहे. या वर्षीही साधारण एवढय़ाच जोडण्या दिल्या जात आहेत. या जोडण्यांमधून बेस्टला गेल्या वर्षी ९९ लाख रुपये शुल्क मिळाले. मात्र तरीही गेल्या वर्षी तब्बल ४५ अनधिकृत जोडण्यांच्या घटना उघडकीला आल्या. बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने छापे टाकून या जोडण्यांसाठीचे शुल्कही वसूल केले. मात्र तरीही उघडकीस न आलेल्या आणि त्यामुळे इतर ग्राहकांवर भार होत असलेल्या जोडण्या किती तरी अधिक असू शकतील, असा कयास आहे.
विभागाला विद्युत पुरवठा करणाऱ्या जोडण्यांच्या बॉक्समध्ये तार टाकून हा पुरवठा घेतला जातो. त्यामुळे अनेकदा जोडणीचा बॉक्स उघडा टाकला जातो. यावर पावसाचे किंवा इतर पाणी सांडल्यास शॉर्ट सíकटचा धोका असतो, तसेच लहान मुले, पादचाऱ्यांना विजेचा धक्का बसण्याचाही धोका असतो. खरे तर इतर व्यावसायिक दरांपेक्षा गणेशोत्सवासाठी विद्युत दर कमी ठेवला जातो. मात्र तरीही फुकट ते पौष्टिक या मताने अनेक गणेशोत्सव मंडळे वीज चोरतात. या वीजचोरीला आळा घालण्यासाठी दक्षता पथके नेमण्यासोबतच वीज कंपन्यांनी नामी शक्कल लढवली आहे.
आमच्याकडे गेली अनेक वष्रे विद्युत जोडणीच्या खांबातील बॉक्समधून अनधिकृतपणे वीज घेतली जात होती. या संदर्भात मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र गणेशोत्सव हा धार्मिक सण असल्याने त्याबाबत कोणीही कारवाईसाठी पुढे येत नव्हते. या जोडणीतून संपूर्ण रस्ताभर विद्युत रोषणाई केली जात असली तरी त्याचा भार अखेर परिसरातील रहिवाशांवरच पडत असे. या वेळी मात्र विद्युत पुरवठा कंपनीने अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील वीजजोडणीचे बॉक्स सीलबंद केले आहेत. त्यामुळे जोडणी घेताच येणार नाही, असे अंधेरी येथील अशोक प यांनी सांगितले. अर्थात हे सीलबंद प्रकरण फक्त अंधेरीपुरते मर्यादित नाही.
अनधिकृत विद्युतजोडणीमुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार पडतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा धोक्यात येते. शॉर्ट सíकट होण्याची तसेच गंभीर घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील विविध ठिकाणचे वीजजोडणीचे बॉक्स सीलबंद करण्यात आले आहेत, असे रिलायन्स एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी म्हणाले. गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. मंडळांनी अर्ज केल्यावर त्यांना तातडीने वीजमीटर दिले जातात. त्यामुळे अनधिकृत जोडणी घेण्याची गरज नाही. या जोडणीमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. आमची दक्षता पथके अशा जोडण्या शोधून त्यांच्याकडून शुल्क वसूल करतात, पण मुळात या जोडण्याच बंद होण्याची गरज आहे, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिली.

बेस्टच्या दक्षता पथकाने शोधलेली प्रकरणे
२०१०- ९०,९४३
२०११- ६०,४९४
२०१२- ७९,१९१
२०१३- १,६३,०९६
२०१४- १,२१,२३४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2015 10:25 am

Web Title: electricity robbery by ganesh mandals
टॅग : Ganesh Mandals
Next Stories
1 सुरक्षेची जबाबदारी मंडळांवरच!
2 वरळीच्या वसतिगृहात पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल
3 लोकप्रतिनिधींवर न्यायालय नाराज
Just Now!
X