08 December 2019

News Flash

उपनगरासाठीचा वीजप्रकल्प ठप्प

अदानीकडून खुल्या बाजारातून वीजखरेदी

कोळशाचा तुटवडा, आर्थिक अडचणीचा परिणाम; अदानीकडून खुल्या बाजारातून वीजखरेदी

मुंबई उपनगराला ६०० मेगावॉट वीजपुरवठा करणारा अनिल अंबानी समूहातील कंपनीचा वीज प्रकल्प कोळशाचा अभाव व आर्थिक अडचणींमुळे बंद पडला असून उपनगरात भारनियमन टाळण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.ने खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा सुरू ठेवला आहे. सध्या खुल्या बाजारात वीज स्वस्त असली तरी उन्हाळा तोंडावर असल्याने कधीही बाजारातील वीज महाग होण्याची शक्यता असल्याने मुंबई उपनगरातील वीजग्राहकांवर महाग विजेची टांगती तलवार आहे.

मुंबई उपनगरात वर्षभरापूर्वी अनिल अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रस्ट्रक्चर कंपनीतर्फे वीजपुरवठा होत होता. याच समूहातील विदर्भ इंडस्ट्रिज पॉवर लि.ने बुटीबोरी येथे ६०० मेगावॉटचा वीज प्रकल्प उभारला. या प्रकल्पातील वीज मुंबई उपनगरातील ग्राहकांना पुरवण्यासाठी प्रति युनिट ४.३८ रुपये दराने वीजखरेदी करार करण्यात आला.

मागील वर्षी रिलायन्सचा मुंबईतील वीज व्यवसाय अदानी समूहातील कंपनीने विकत घेतला. दरम्यानच्या काळात कोळशाच्या वादातून ३०० मेगावॉटचा एक संच डिसेंबरअखेरीस बंद पडला. त्यानंतर दुसऱ्या ३०० मेगावॉटच्या संचातून वीजपुरवठा सुरू होता. मात्र, ही वीज महाग कोळशावर आधारित असल्याने करारातील रकमेत वीज देणे परवडत नाही. वीजदर वाढवावा, अशी व्हीआयपीएलची मागणी आहे. मात्र, अद्याप त्याबाबतचा राज्य वीज नियामक आयोगाचा आदेश आलेला नाही. त्यामुळे जुन्या दराने वीज देण्यात तोटा होत असल्याच्या कारणामुळे दुसऱ्या संचातील वीजपुरवठाही जानेवारीच्या उत्तरार्धात बंद झाला.

आता मुंबई उपनगराला वीजपुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी अदानी कंपनीने खुल्या बाजारातून वीजखरेदी सुरू केली आहे. ती वीज सध्या साडेतीन ते चार रुपये प्रति युनिट अशा दराने मिळत आहे. रिलायन्सच्या प्रकल्पातील विजेपेक्षा ही वीज स्वस्त असली तरी उन्हाळा तोंडावर आहे. उन्हाळ्यात खुल्या बाजारातील विजेचे दर महाग होण्याची भीती असते. तशात निवडणुकीच्या काळात भारनियमन टाळण्यासाठी सर्वच राज्यातील सरकारी वीज कंपन्या मोठय़ा प्रमाणात वीज खरेदी करतात. त्यामुळे विजेचे दर जवळपास दुप्पटही होतात, असा अनुभव आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील वीजग्राहकांवर भविष्यात महाग विजेचे संकट कोसळण्याची भीती आहे.

याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, सध्या बाजारातून स्वस्त वीज घेऊन मुंबई उपनगराला वीजपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई उपनगरातील ग्राहकांना माफक दरात अखंड वीज मिळावी यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी कटिबद्ध असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे अदानीच्या प्रवक्त्याने सांगितले.

रिलायन्सचा बुटीबोरीतील प्रकल्प बंद पडल्यानंतर सध्या बाजारातून मुंबई उपनगरासाठी स्वस्त वीज विकत घेण्यात येत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज आहे. अन्यथा भविष्यात भारनियमन किंवा महाग विजेचे संकट येऊ शकते. त्यासाठी रिलायन्ससोबत असलेल्या वीजखरेदी कराराचा फेरविचार करून पर्यायी व्यवस्था व्हायला हवी.    – अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

First Published on February 11, 2019 12:41 am

Web Title: electricity shortage in maharashtra 11
Just Now!
X