टाटा पॉवर वीजपुरवठा केंद्रात बिघाड

टाटा पॉवर वीजपुरवठा केंद्रात झालेल्या बिघाडामुळे मुंबई शहरातील वीज दोन तास खंडित झाल्याची घटना रविवारी घडली. आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या रहिवाशांना वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळी १०.५० च्या सुमारास परळ येथील टाटा पॉवर वीजपुरवठा केंद्रात बिघाड झाला. या बिघाडामुळे परळ, शिवडी, भायखळा, माटुंगा, माहीम, सायन, मुंबई सेन्ट्रल, लालबाग, महालक्ष्मी, वरळी, हाजी अली, मलबार हिल, खंबाला हिल परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. हा बिघाड होताच तात्काळ त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. टप्प्याटप्प्यात काही परिसरातील वीजपुरवठा पूर्ववतही करण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही भागांत दहा ते २० मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, तर अन्य भागांत मात्र त्यासाठी एक ते दोन तास लागले. दुपारी १२.५० वाजता सर्व भागांतील पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती टाटा पॉवर व बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. मात्र यामुळे रहिवाशांना मनस्ताप झाला. आधीच वाढलेला उकाडा व त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याची आणखी भर पडली. वीजपुरवठा केंद्रात नेमका बिघाड कशामुळे झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही. याची चौकशी केली जाणार असल्याचे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.