हिवताप आणि मूत्रपिंडाच्या विकारामुळे मुंबईतील दहिसर येथील ‘लक्ष्मी’ (वय ४८) या हत्तिणीचा मृत्यू झाल्याचे हत्तिणीच्या शवविच्छेदन अहवालावरून समोर आले आहे. गुरुवारी निधन झालेल्या या हत्तिणीची मालकी सभाशंकर पांडे यांच्याकडे होती. पांडे यांच्या दहिसर येथील घरी तिचा मृत्यू झाला. या आधीही पांडे यांच्याकडील ‘रुपकली’ हत्तिणीचा मृत्यू झाला होता.

वन विभागाने शुक्रवारी सकाळी त्या हत्तिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. ‘लक्ष्मी’ हत्तिणीच्या आरोग्याकडे पांडे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तिचा आणि ‘रुपकली’चा मृत्यू झाला असल्याचा दावा वन्यजीवरक्षकांनी केला आहे. तर ‘लक्ष्मी’ला मूत्रपिंडाचा विकार होता. तसेच मूत्रपिंडामध्ये खडेही झाले होते. ही बाब शवविच्छेदन अहवालावरून समोर आली असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

बिहारच्या वन विभागाने दिलेल्या या हत्तींच्या स्वामित्व हक्काचे परवाने पांडे यांच्याकडे होते. २०१३ मध्ये ठाणे वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांनी बिहार वन विभागाला पांडे यांच्याकडील हे परवाने रद्द करण्याबाबत पत्र लिहिले होते. मात्र बिहार वन विभागाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने पांडे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. ‘अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया’ या शासकीय संस्थेनेही २०१४ मध्ये पांडे यांच्याकडील हत्तींच्या मनोरंजनात्मक वापरासंबंधीचा परवाना रद्द केला होता. असे असतानाही पांडे यांनी मनोरंजनात्मक कामासाठी हत्तींचा वापर सुरू ठेवला असल्याची माहिती मुंबई शहर विभागाचे मानद वन्यजीवरक्षक सुनीश कुंजू यांनी दिली.