हार्बर मार्गावरील ५५ किमीच्या एलिव्हेटेड मार्गावरील ७४ टक्के मार्ग वरून जाणार असून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाण्यासाठी कुर्ला आणि टिळकनगर स्थानकांदरम्यान एक नवे स्थानक बांधण्यात येणार आहे. या एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी लवकरच राज्य सरकारकडे अर्थसहाय्यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर ४० किमीचा मार्ग हा उंचावरून जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांना या मार्गाचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन’ सादर केले. त्यानंतर १२ हजार कोटीच्या या प्रस्तावासाठी आवश्यक त्या अर्थसहाय्यासाठी लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
एलिव्हेटेड कॉरीडॉरचा हा प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारीतून पूर्ण करण्यात येणार आहे. निधी उभारण्यासाठी या मार्गावरील जवळपास एक कोटी चौरस फूट जागेचा व्यापारी विकास करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानकाचा परिसर, कार डेपो आदी जागांचा समावेश आहे. शक्य असेल तेथे ५ चटई क्षेत्र निर्देशांक मागण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईमध्ये इतके क्षेत्र मिळणे शक्य नसल्याने मुंबईबाहेर अशी जागा मिळावी असा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येणार आहे. राज्य शासनाला सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात या बाबींचा उल्लेख करण्यात येणार आहे. या मार्गावर ११ स्थानके असतील. लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाण्यासाठी प्रवाशांना कुर्ला अथवा टिळकनगर येथे उतरावे लागणार
नाही. त्यासाठी एक नवे स्थानक उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.     
एप्रिलपासून १० डब्यांची गाडी
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान एप्रिल महिन्यापासून १० डब्यांची गाडी धावण्यास सुरुवात होणार आहे. हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी सुरू करण्यासाठी अर्थसहाय्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यानंतर रेल्वे फलाटांची लांबी वाढविण्याच्या कामास या आठवडय़ात सुरुवात होत आहे. प्रथम १० डब्यांची गाडी या मार्गावर धावेल असे सूत्रांनी सांगितले. एप्रिल २०१३ पासून १० डब्यांची गाडी धावण्यास सुरुवात होईल तर १२ डब्यांची गाडी सुरू होण्यास डिसेंबर २०१४ उजाडणार आहे.