कुर्ला-वाकोला प्रकल्पात १०९ कोटींची अतिरिक्त कामे; प्रकल्प पूर्ण होण्यास २०२२ उजाडणार

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई :  सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) विस्तारीकरणातील कुर्ला (प.) ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गामध्ये अनेक कारणांनी अतिरिक्त कामे वाढून एकूण खर्चात १०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सततच्या रखडपट्टीमुळे पूर्णत्वास विलंब होत असलेल्या या मार्गासाठी मार्च २०२२ पर्यंत वाट पाहावी लागेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अतिरिक्त खर्च आणि मुदतवाढीस मान्यता देण्यात आली.

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा मार्ग म्हणून एससीएलआर बांधण्यात आला. या रस्त्याच्या कुर्ला ते वाकोला या विस्तारीकरणासाठी कुर्ला ते वाकोला आणि भारत डायमंड कंपनी ते वाकोला जंक्शन अशा दोन उन्नत मार्गांची योजना एमएमआरडीएने मांडली. त्यापैकी कुर्ला ते वाकोला जंक्शन या भाग एकच्या ४४९.१९ कोटी रुपयांच्या कामास प्राधिकरणाच्या कार्यकारी समिती बैठकीत जुलै २०१५ ला मान्यता मिळाली. या उन्नत मार्गाच्या कामास २७ ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पपूर्तीसाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली.

प्राधिकरण कार्यकारी समितीच्या १५ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीत अतिरिक्त खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. उन्नत मार्गादरम्यान मुंबई विद्यापीठाने रस्त्याची मध्यरेषा स्थलांतरीत केल्याने सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे, नवीन पोहोच मार्ग, मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण आणि बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या दोन खांबांमधील गाळ्याची लांबी वाढवणे अशा अतिरिक्त कामांचा समावेश झाला आहे.

रस्त्याची मध्यरेषा स्थलांतरीत केल्याने सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराच्या खर्चात वाढ झाली आहे. तर वाहतूक पोलिसांनी केलेल्या सूचनांमुळे नवीन पोहोच मार्गाच्या कामाची भर पडली आहे. यासाठी सुमारे १०९ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. या अतिरिक्त खर्चास आणि मुदतवाढीस यावर्षी १५ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे इतिवृत्तात म्हटले आहे.

मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचा खर्च महापालिकेकडून आणि बुलेट ट्रेनमुळे होणारा वाढीव खर्च एनएचआरसीएल यांच्याकडून एकूण ८७ कोटी रुपये एमएमआरडीएला प्राप्त झाला असून ती कामे एमएमआरडीएकडून करण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रकल्पपूर्ती लांबल्याने वाहतूक कोंडीचा त्रास

कुर्ला (प.) ते सांताक्रूझ (पू) या टप्प्यातील प्रवासात गेल्या काही वर्षांंपासून सातत्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. मुंबई विद्यापीठ ते कुर्ला (प.) स्थानक या प्रवासासाठी किमान ४५ मिनिटे लागतात. हेच अंतर पायी चालत गेले तर ३५ मिनिटे लागतात. मात्र येथे सुरू असलेल्या कामांमुळे या टप्प्यात पायी प्रवास करणे कठीण जाते. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुल किंवा सांताक्रूझ गाठताना कुर्ला पश्चिमेस मिठी नदीपाशी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. कुर्ला ते वाकोला जंक्शन हा उन्नत मार्ग वेळेत पूर्ण झाला असता, तर ही कोंडी कमी झाली असती. मात्र मूळ कामात होत असलेला विलंब आणि अतिरिक्त कामांची वाढती यादी यामुळे या टप्प्यातील प्रवास सुकर होण्यासाठी अजून सव्वा वर्ष वाट पाहावी लागेल.