राज्य शासनाच्या विविध खात्यांमधील रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाने घातलेल्या र्निबधामधून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची पदे मुक्त करण्यात आल्यामुळे आरोग्य विभागातील १०८५५ पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबतचा आदेश शासनाने जारी केला असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी आता आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

आर्थिक बोजाचे कारण पुढे करत वित्त विभागाकडून पदे भरण्यास मान्यता मिळत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या उपचारावर मर्यादा येतात ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाचे र्निबध उठविण्याचा निर्णय घेतला.
आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के एवढी पदे भरण्यास आता मान्यता मिळाली असून डॉक्टरांचे ११५२ तर परिचारिका व तंत्रज्ञांसह अत्यावश्यक सेवेअंतर्गत ५३०६ पदे भरण्यात येणार आहेत. याशिवाय राज्य कामगार विमा योजनेतील २३१७ व आरोग्य विभागातील ‘ड’ वर्गातील २७८९ पदे भरली जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

‘लोकसत्ता’कडून पाठपुरावा
आरोग्य विभागातील अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांपासून वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य वर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची तपशीलवार माहिती ‘लोकसत्ता’ने उघड केली होती.