प्रवेश यादीत नाव आल्यावर महाविद्यालयात शुल्क भरूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ६५ विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश रद्द झाल्याचे समोर आले आहे. चेंबूर येथील एन.जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हा गोंधळ झाला आहे.

ऑनलाइन प्रवेश यादीत नाव आल्यावर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शुल्क भरले. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली असे वाटल्याने विद्यार्थी निर्धास्त झाले. मात्र, आता प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यांत असताना ६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नसल्याचे समोर आले आहे.

महाविद्यालयाने प्रवेश निश्चित करताना गोंधळ केला असल्याचा आरोप पालक प्रतिनिधी स्वाती पाटील यांनी केला आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसरीकडे प्रवेश कसा घ्यायचा, असा पश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. ऑनलाइन प्रक्रियेत प्रवेश घेण्यास ‘संमती’ असा पर्याय असतो. तो न स्वीकारल्यामुळे प्रवेश निश्चित झाले नाहीत. याबाबत विद्यार्थ्यांना वारंवार आठवण करण्यात आली होती,’ असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे.

‘प्रवेश निश्चित न झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने केलेल्या प्रक्रियेची छाननी करून याबाबत निष्कर्ष काढण्यात येईल. या प्रकाराची पडताळणी सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,’ असे शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी सांगितले.