मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे. दुसरी फेरी स्थगित करून पंधरा दिवस झाले तरीही अद्याप काहीच स्पष्ट झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

अकरावीची पहिली फेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रियांबाबत संभ्रम निर्माण झाला. अकरावीची दुसरी फेरी शिक्षण विभागाने स्थगित केली. त्याला आता पंधरा दिवस झाले असूनही अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. नियमित शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत एक सत्र संपत आले असताना मुळात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यात वाढलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालये पहिल्या फेरीत मिळाली नाहीत. त्यामुळे पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते. प्रत्येक विभागातील लाखो विद्यार्थी दुसऱ्या प्रवेश फेरीच्या प्रतिक्षेत असताना ही फेरी स्थगित झाली. त्यामुळे प्रवेश कधी होणार, त्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार अशा चिंतेत विद्यार्थी आहेत. पहिल्या फेरीत मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश रद्द होऊन पुन्हा एकदा स्पर्धेला तोंड देण्याची धास्ती आहे. याबाबत शिक्षण विभागाने शासनाने विचारणा केली असून शासनाकडून अद्याप काहीच उत्तर आलेले नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेरपरीक्षेबाबतही अनिश्चितता

दहावीला एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एटीकेटी)अकरावीला प्रवेश मिळतो. शेवटच्या फेरीत रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतात. या विद्यार्थ्यांना किंवा दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांत फेरपरीक्षा देता येणार का याबाबत अनिश्चितता आहे. फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे नियोजन राज्यमंडळाकडून करण्यात येत होते. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाहीत. मात्र, त्या कधी होणार, त्याचे निकाल कधी लागणार आणि विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षांत अकरावीला प्रवेश घेता येणार का याबाबत शिक्षण विभागाने काहीच स्पष्ट केलेले नाही.