03 June 2020

News Flash

तपासाबाबत राज्य सरकारची खेळी!

एल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.

‘एल्गार आणि भीमा-कोरेगाव स्वतंत्र प्रकरणे’

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव ही दोन स्वतंत्र प्रकरणे असल्याची भूमिका मांडत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणांच्या तपासाबाबत नव्या खेळीचे संकेत दिले. एकीकडे, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारच करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे, ‘एल्गार’चा तपास ‘एनआयए’कडे सोपवून आंबेडकरी चळवळीस नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला.

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्याकडेच

सिंधुदुर्ग : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हे दोन स्वतंत्र विषय आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिलेला नाही, तर एल्गार परिषदेबाबचा तपास या संस्थेकडे सोपविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भीमा-कोरेगावचा तपास राज्याकडेच राहणार असून, तो ‘एनआयए’कडे देण्यात येणार नाही. दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा डाव’

मुंबई : एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने घाईघाईत एनआयएकडे दिला. हा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

एल्गारच्या तपासावर बोलताना थोरात पुढे म्हणाले की, ते व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिल्यास ते संशायस्पद वाटते, असे थोरात म्हणाले.

पुरोगामी विचारांच्या दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या ‘एल्गार’वर कारवाई करून या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:33 am

Web Title: elgar and bhima koregaon independent cases state government inquiry into the investigation akp 94
Next Stories
1 ‘आधीच्या सरकारकडून पोलीस दलाचा गैरवापर’
2 उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत
3 शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे लाभ लांबणीवर?
Just Now!
X