वैचारिक आदानप्रदान ही महाराष्ट्राची संस्कृती असून लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचे जतन करण्याचे काम केले जात आहे आणि ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाटककार प्रशांत दळवी यांनी केले.
‘लोकसत्ता’च्या वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. औरंगाबादमधील माझ्या महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धामधून सहभागी होता आले. त्या अनुभवातून खूप शिकायला मिळाले. या सर्वाचा उपयोग मला माझ्या पुढील आयुष्यात झाला. मी वक्ता म्हणून पुढे आलो नसलो, तरी नाटककार आणि चित्रपट लेखक म्हणून काम करत असताना या स्पर्धामधील सहभागाचा आणि अनुभवाच्या शिदोरीचा मला फायदा झाला. नाटकातील विविध पात्रांच्या तोंडून मला माझे विचार व्यक्त करता आले. अशा स्पर्धाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या आत्मविश्वासाचे जतन करा! विविध वक्त्यांची भाषणे आणि व्याख्याने ऐका! तुमच्यात ऊर्जा आहेच, त्याला आशयाची जोड मिळाली, तर वक्तृत्व फुलून येण्यास नक्कीच मदत होईल.

ऐकत राहावेसे वाटते, ते चांगले भाषण – नायगावकर
एखादा गायक गाताना त्याचे गाणे आपल्या मनात आपण गुणगुणतो, त्याप्रमाणे एखाद्या वक्त्याचे ऐकत राहावेसे वाटते, ते चांगले भाषण होय, असे मत अशोक नायगावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या मातीत आपण घडल्याचे सांगून ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात विद्यार्थीदशेत अनेक दिग्गजांची भाषणे ऐकली. प्रचंड वाचन केले. आज मी जो काही आहे, त्या सगळ्याचा तो पाया आहे. चांगले ऐकण्यासाठी सभा, संमेलने, व्याख्याने यांना गर्दी करण्याची आणि ती भाषणे ऐकण्याची मानसिकता आज मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांत दिसून येत नाही. पण महाराष्ट्रातील अनेक छोटय़ा शहरांमध्ये आणि गावांमध्ये ते पाहायला मिळते. आज प्रत्येक जण प्रकाशात येण्यासाठी धडपडत असतो. त्या मुलापेक्षाही त्याच्या आईवडिलांनाच आपल्या मुलाला झटपट यश मिळावे, असे वाटत असते. पण असे खूप लवकर पदरात पडलेले यशही कधी कधी माणसाला पुढील आयुष्यात अपयशी बनवते. अशी माणसे पुढील आयुष्यात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे पुढील यश मिळवण्यासाठी आधी अपयशही पाहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रतिक्रिया
प्रथम पारितोषिक मिळाल्याचा आनंद मोठा आहे. मुंबई विभागातून मी प्रथम आलोय आणि आता सर्व महाराष्ट्रातून अव्वल ठरलेल्या स्पर्धकांशी स्पर्धा करायची आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. मी या आधी काही वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतला होता, पण ‘लोकसत्ता’ने आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची संधी दिली. इतकं मोठं व्यासपीठ देण्याबद्दल लोकसत्ताचे आभार.
– श्रेयस मेहंदळे (रुपारेल कॉलेज, माटुंगा) (प्रथम पारितोषिक विजेता)
*****
लोकसत्ताने आयोजित ‘वक्तृत्व स्पर्धा’ ही बौद्धिक चालना देणारी उत्तम स्पर्धा होती. स्पर्धेसाठी आम्हाला दिलेले विषय सोपे नव्हते. कोणताही विषय निवडून त्यावर भाषण तयार करताना पुरेसे वाचन करण्याची आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करायची गरज होती. भाषणाच्या तयारीसाठी ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखांचे आणि इतर लेखांचे भरपूर वाचन केले होतेच. रोजच्या बातम्यांवरही माझे लक्ष होते.
– प्रणव पटवर्धन (साठय़े कॉलेज, विलेपार्ले)
*****
‘वक्तृत्व स्पर्धा’ माझ्यासाठी वैचारिकरीत्या चालना देणारी होती. स्पर्धेमधील स्पर्धकही तुल्यबळ होते, त्यामुळे भाषण सादर करताना उत्साह आला. मी मराठी साहित्याची अभ्यासक असल्यामुळे त्यानुसार विषयाची निवड केली होती. त्यासाठी मी कित्येक लोकांशी बोलून, चर्चा करून महत्त्वाचे मुद्दे नमूद करून त्यावरून माझे भाषण लिहिले. अर्थात हे करताना वेळेचे गणितही पाळले होते.  
– प्रियांका तुपे (रुईया कॉलेज, माटुंगा) (द्वितीय पारितोषिक विजेती)
*****
‘लोकसत्ता’ची ‘वक्तृत्व स्पर्धा’ आपले विचार मांडण्याचा एक उत्तम मंच होता. स्पर्धेसाठी मला गंभीर पण सध्या चर्चेत असलेला विषय निवडायचा होता. भाषण तयार करण्यासाठी इंटरनेट या माध्यमाचा खूप उपयोग झाला.
– गौरांगी ललित (के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, विद्याविहार)
*****
 एरव्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचे विचार जगासमोर मांडण्याची संधी मिळत नाही. या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला ही संधी मिळाली.  स्पर्धेचा विषय स्पर्धकांची काठिण्यपातळी तपासणारा होता. तयारीसाठी माझ्या शिक्षकांनी मला मोलाची मदत केली. तसेच अनेक संदर्भपुस्तिकांचे वाचनही मी केले होते.
– संजय दाभोळकर (रुईया कॉलेज, माटुंगा)
*****
 अशा स्पर्धामध्ये पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीत निवडलेल्या विषयांमध्ये विविधता ठेवावी लागते. त्यानिमित्ताने या विषयांवर अभ्यास करण्याची संधी मिळते.
– गौरी केळकर (रुपारेल कॉलेज, माटुंगा) (तृतीय पारितोषिक विजेती)
*****
पहिल्याच स्पर्धेमध्ये इतका मोठा मंच मिळणे, माझ्यासाठी खूप प्रेरणा देणारे होते.  मी निवडलेल्या विषयामुळे मला आबालवृद्धांपासून ते समाजातील विविध स्तरातील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
वेदवती चिपळूणकर (साठय़े कॉलेज, विलेपार्ले)

वक्ता घडविण्यासाठी’
डॉ. मेधा मेहंदळे (तन्वी हर्बल, कार्यकारी अधिकारी)
‘लोकसत्ता’ने  ‘वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन केल्याचे कळल्यावर आम्ही स्वत:हून या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारण्यासाठी पुढे आलो होतो. कारण, या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचा वक्ता तयार होण्यास मदत होणार आहे. आजची पिढी सोशल मीडियावर सतत संवाद साधत असते, पण वैचारिक पातळीवर अभ्यास करून लोकांपुढे आपली मते मांडण्यासाठी अशा व्यासपीठाची गरज आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धनही होण्यास मदत होते आहे.