चौपदरीकरणाची घोषणा; मात्र आधीच्या पुलांच्या कामांचे भिजत घोंगडे

परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांतील प्रवाशांच्या गर्दीसोबतच वाहनांच्या वर्दळीने सदैव गजबजलेल्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाची योजना पालिकेने आखली असली तरी, प्रत्यक्षात या पुलाचे नूतनीकरण होण्यासाठी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी या पुलाची पाहणीदेखील केली. परंतु, या पुलाच्या आधी रेल्वे मार्गावरील हँकॉक पुलासह पाच पुलांची कामे प्रलंबित असल्याने एल्फिन्स्टन पुलाचा क्रमांक कधी येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, आधीच प्रलंबित असलेल्या पुलांच्या कामांच्या निविदाही तीन वर्षांमध्ये निघू शकलेल्या नाहीत.

मध्य रेल्वेचे परळ व पश्चिम रेल्वेचे एल्फिन्स्टन या रेल्वे स्थानकांबाहेर असलेल्या या पुलाबाबत अनेक वर्षे तक्रारी सुरू आहेत. हा पूल वातानुकूलित रेल्वेच्या मार्गातही अडथळा आहे. सध्या तो धोकादायक अवस्थेत असून एखादे वाहन जरी पुलावरून गेले तरी पादचाऱ्यांना त्याचे हादरे बसतात. त्यामुळे या पुलाला ‘हलता’ पूलही म्हटले जाते. मात्र हा पूल सुरक्षित असल्याचा रेल्वेचा दावा आहे.  मंगळवारी या परिसराची पाहणी करत असताना महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा दुपदरी पूल चौपदरी करण्याबाबत अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. मात्र हा पूल पाडून चौपदरी करणार की त्याचे दोन्ही बाजूंनी रुंदीकरण केले जाणार, याबाबत सध्या काहीच निर्णय झालेला नाही.

पुलाखालून गाडय़ांची वाहतूक सुरू असताना त्यावरून पुलाचे काम करणे अत्यंत जिकिरीचे असते. त्यामुळे पालिका पुलाच्या कामासाठी पैसे देऊन रेल्वेला पूल बांधण्यास सांगते, असे पालिकेतील अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हँकॉक व कर्नाक हे दोन्ही पूल असुरक्षित असल्याने पालिकेने स्वत  पुढाकार घेऊन ते बांधायला घेतले मात्र या दोन्ही पुलांसह विक्रोळी, नाहूर व विद्याविहार या तीनही पुलांची कामे सध्या केवळ निविदेच्याच पातळीवर आहेत. त्यातच रेल्वेवरील पूल बांधणे हे तांत्रिकदृष्टय़ा जोखमीचे असल्याने फारच कमी कंत्राटदार या कामात आहेत. त्यातच रस्ते घोटाळ्यात नाव आल्याने जे. कुमार या कंत्राटदाराकडे दिलेली हँकॉक, कर्नाक व विक्रोळी पुलाची कामेही रखडली आहेत.

रेल्वेशी करावा लागणारा समन्वयही पुलाच्या कामात अडथळा आहे. एल्फिन्स्टन पूल हा पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे मार्गावरून जात आहे. अशा वेळी दोन्ही रेल्वेशी समन्वय साधून या पुलाबाबत निर्णय घ्यावा लागेल. करी रोड येथील पुलाचा निर्णयही मोनोमुळे आधीच दोन वर्षे रखडलेला असताना आणि त्याबाबत पुढे फारसे काही होत नसताना नवीन पुलाची रचना, प्रस्ताव व वास्तविक काम सुरू होण्यास अनेक वर्षे जातील, असे पालिकेच्या पूल विभागातील एका अभियंत्याने स्पष्ट केले.

रेल्वे पुलांच्या कामाची सद्यस्थिती

  • कर्नाक पूल – सीएसटी ते मशीद बंदर दरम्यान असलेला १४८ वर्षे जुना पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ४१ कोटी रुपये खर्चाच्या या पुलासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र रस्ते कंत्राटात गुन्हा नोंदवला गेलेल्या जे. कुमार या कंत्राटदाराला यापूर्वी हे काम मिळाले असल्याने हे वाद न्यायालयात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरच नव्या निविदा उघडण्यात येणार असल्याने हा पूलही हवेत आहे.
  • हँकॉक पूल – १२५ वर्षे जुना असलेला हा पूल जानेवारीत पाडण्यात आला. भायखळा व सॅण्डहस्र्ट रोड दरम्यान असलेला हा पूल बांधण्यासाठीही जे. कुमारकडेच काम देण्यात आले होते. हा पूल पाडल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडताना शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने ते प्रकरणही न्यायालयात गेले होते. या पुलासाठीही पुन्हा निविदा काढण्यात आल्या असल्या तरी न्यायालयीन निर्णयाखेरीज या पुलाचे काम पुढे सरकणार नाही.
  • विक्रोळी – रस्ते कंत्राटातील घोटाळ्यामुळे विक्रोळी येथील पुलाचे कामही रखडले आहे. आरपीएस इन्फ्रा आणि जे. कुमार या दोन्ही कंत्राटदारांकडे दिलेली कामे न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याने विक्रोळीच्या निविदांचे कामही पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
  • नाहूर, विद्याविहार – रेल्वेने या पुलाच्या रचनेला मान्यता दिली आहे. सुमारे ६० कोटी रुपये खर्चाच्या या पुलासाठीही निविदांचे काम सुरू आहे. जानेवारीमध्ये हा प्रकल्प सुरू होऊन तो पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागतील.