परळ स्थानकात साहित्य ठेवण्याचा लष्करासमोर यक्षप्रश्न

लष्कराकडून परळ स्थानकातील पादचारी पुलाचा विस्तार केला जाणार आहे, मात्र विस्तार करताना लष्कर आणि रेल्वे प्रशासनासमोर पुलाच्या बांधकामासाठी जागेची अडचण आहे. पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य नेमके ठेवायचे कुठे आणि बांधकाम करायचे कसे, अशी चिंता सतावत असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अपघातानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी परळ स्थानकात दादरच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाचा विस्तार एल्फिन्स्टन रोड स्थानकापर्यंत केला जाणार आहे. त्याचे काम लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप’तर्फे केले जाईल. या ग्रुपतर्फे तयार करण्यात आलेल्या आरेखनाला पश्चिम रेल्वेकडून अंतिम मंजुरी देण्यात आली. पुलाचे काम डिसेंबरमध्ये हाती घेण्यात येणार असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच काम सुरू होणार आहे. पुलाचा विस्तार करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलासाठी आवश्यक असलेले बांधकाम, पुलाचा पाया खणण्यासाठी नियोजित जागा याचे नियोजन जरी लष्कराने केले असले तरी पादचारी पुलावर निमुळती जागा आहे. तसेच दादरकडून फुलबाजाराच्या दिशेने स्थानकाकडे येण्यासाठी असलेली जागाही निमुळती असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लष्कराला या ठिकाणी बांधकाम करताना लागणारे साहित्य ठेवण्यासाठी मोठी अडचण येणार आहे.

दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांना जाग

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर परळपासून एल्फिन्स्टन रोज स्थानकाला जोडणाऱ्या पुलाबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्वरित मान्यता दिली नाही. दुर्घटना घडल्यानंतर १२ दिवसांनी आपले अभिप्राय दिल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वेकडून माहिती देण्यात आली. यामध्ये रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंता यांना लिहिलेले पत्रही आहे. ९ जुलै रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी परळ स्थानक येथे पादचारी पूल बांधण्याबाबत कळविले होते. २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन  दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांना जाग आली आणि त्यानंतर ११ ऑक्टोबरला मुख्य अभियंता यांनी परळ स्थानकाचे निरीक्षण केले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ ऑक्टोबर २०१७ रोजी अहवाल पाठविला. यात  आयुक्तांनी प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असणे, रस्त्याच्या दिशेने बाहेर पडणे आणि आत येण्याचा मार्ग व्यवस्थित नसल्यास परळ येथे अतिरिक्त सुविधा देणे कुचकामी ठरेल, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले असे त्यांनी सांगितले.