अधिसूचना काढून वर्ष उलटले तरी दुर्लक्षच; पश्चिम रेल्वेकडून पुन्हा प्रस्ताव

रेल्वे मंत्रालय आणि पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार आणि मंत्र्यांना नामकरण समारंभासाठी वेळ न मिळाल्याने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामांतर गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. अधिसूचनेची एक वर्षांची मुदत संपल्याने अखेर पश्चिम रेल्वेने प्रभादेवी नामांतराचा दुसरा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे नामांतराची केवळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा यासह एल्फिन्स्टन स्थानकाचे प्रभादेवी नामांतरण करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रथम राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आणि त्याला मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढली. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात महाराज या शब्दाचा समावेश करण्यात आला. तर एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. अधिसूचना काढल्यानंतर पश्चिम रेल्वेने जुलै महिन्यातील पहिल्या आठवडय़ात एल्फिन्स्टनच्या नामांतरासाठी संबंधित विभागांना सूचनाही दिल्या आणि या सूचनांनंतर स्थानकाचा कोडही ठरविण्यात आला. तर अन्य तांत्रिक कामेही पूर्ण करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकल गाडय़ांच्या डब्यातील इंडिकेटरवरही प्रभादेवी नावाची चाचणी घेतली गेली. या सर्व तयारीनंतरही त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यावेळी असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नामांतरण सोहळा पार पाडला जाणार होता. मात्र प्रभू यांच्याकडील रेल्वेमंत्रीपद पीयूष गोयल यांच्याकडे गेले आणि नामांतराचा सोहळा बाजूलाच राहिला.

रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एल्फिन्स्टनचे प्रभादेवी नामांतरासाठी अधिसूचना काढण्यात आली होती. त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून त्याचा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंत्रालयाकडे नुकताच पाठविला आहे. त्यामुळे मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

चेंगराचेंगरी आडवी आली..

सप्टेंबर २०१७ मध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मुंबई दौऱ्यावर येत होते. त्यांच्या हस्ते एल्फिन्स्टनचा नामांतर करण्याचा विचार होता. मात्र त्याचवेळी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतरही नामांतरणाचा विषय पुढे आलाच नाही.