पाच महिने उलटूनही अंमलबजावणीसाठी रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाची प्रतीक्षा

एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे ‘प्रभादेवी’ नामांतरण करण्याचा निर्णय हा कागदावर राहिलेला आहे. पाच महिने उलटूनही नामांतरणाची अंमलबजावणी झाली नसून रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाची प्रतीक्षा पश्चिम रेल्वेला आहे. त्यामुळे नामांतरण होणार कधी असा मोठा प्रश्न आहे.

सीएसटीसह एलफिन्स्टन स्थानकाच्या नावात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. या मागणीनुसार राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढण्यात आली व सीएसटी स्थानकाच्या नावात महाराज असा शब्द समाविष्ट करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)असे करण्यात आले. तर एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतरण करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्यातील पहिल्याच आठवडय़ात पश्चिम रेल्वेकडून एलफिन्स्टन स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना केल्या. या स्थानकाचा कोडही ठरविण्यात आल्यानंतर अन्य तांत्रिक कामेही पूर्ण करून पश्चिम रेल्वेकडून सर्व तयारी करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नामांतरण सोहळा पार पडणार होता. परंतु प्रभू यांच्याकडील रेल्वेमंत्री पद पीयूष गोयल यांच्याकडे गेले आणि नामांतरणाचा विषय बाजूलाच सारला गेला. पीयूष गोयल रेल्वेमंत्री झाल्यानंतर तरी प्रभादेवी स्थानक नावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल, असे वाटत असतानाच त्याकडे पुन्हा दुर्लक्षच झाले आहे. यासंदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पश्चिम रेल्वेकडून नामांतरणाची सर्व तयारी करण्यात आलेली आहे. यामध्ये लोकलमधील उद्घोषणा, लोकल आणि स्थानकातील इंडिकेटर्स, तिकिटांवरील बदलांचा समावेश आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाकडून त्याचे प्रत्यक्षात अंमलबजावणीचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे या स्थानकाचे नामांतरण झालेले नाही. आदेश येताच अंमलबजावणी केली जाईल. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांना विचारले असता लवकरच नामांतरण केले जाईल, असे सांगून यावर आणखी काही बोलण्यास नकार दिला.