मुंबई : पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारपासून प्रभादेवी होईल. १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून या नवीन नावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. या मागणीनुसार राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला आणि एल्फिन्स्टन स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याचीही मंजुरी दिली. मात्र ही मंजुरी मिळूनही पश्चिम रेल्वेकडून त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. अधिसूचनेची मुदत संपल्यानंतर पश्चिम रेल्वेने पुन्हा एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वेने प्रभादेवी नामांतराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जुलैच्या मध्यरात्री म्हणजेच १२ वाजल्यापासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नाव होईल. त्यासाठी आवश्यक नामफलक, उद्घोषणा इत्यादींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. लवकरच तिकिटांमध्येही बदल होतील, असेही सांगण्यात आले.

नामांतर कशासाठी?

मुंबई प्रेसिडन्सीचे १८५३ ते १८६० दरम्यान गव्‍‌र्हनर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड ठेवण्यात आले होते. प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते. त्यामुळे इंग्रजांच्या नावावरून दिलेली स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती.