विश्वास पुरोहित

परळमध्ये राहणारी तेरेसा फर्नांडिस-पॉल… शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघाली…लोअर परळमधील ऑफिसचा तिचा आजचा शेवटचा दिवस होता… सोमवारपासून त्यांचे कार्यालय साकीनाका येथे शिफ्ट होणार होते… पण त्या पूर्वीच तिला मृत्यूने गाठले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे तेरेसा फर्नांडिसला आठ महिन्याचं लहान बाळ आणि पाच वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत.

लोअर परळमधील एका ख्यातनाम अॅड एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तेरेसा फर्नांडिस पॉलचे ऑफिस साकीनाका येथे शिफ्ट होणार होते. ऑफिसमधील बहुसंख्य कर्मचारी साकीनाक्यात शिफ्ट झाले होते. तर तेरेसा फर्नांडिससह मोजकी मंडळीच लोअर परळच्या ऑफिसमध्ये होती. ऑफीसचे कोणते डिपार्टमेंट कधी शिफ्ट होणार हे देखील तिनेच प्रत्येकाला ई-मेलद्वारे कळवले होते.

शुक्रवारी लोअर परळमधील ऑफीसमध्ये जाण्यासाठी तेरेसा फर्नांडिस एल्फिन्स्टनच्या पुलावर आली. मात्र याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि तेरेसाचा मृत्यू झाला. तेरेसाच्या मृत्यूचे वृत्त समजताच तिच्या कार्यालयात शोककळा पसरली. अनेकांना हे वृत्त ऐकून धक्काच बसला. सोमवारपासून तेरेसा फर्नांडिसही साकीनाका येथील कार्यालयात जाणार होती.  तेरेसा या मार्गाने कधीच येत नाही असेदेखील समजते. मात्र याविषयी तिच्या कुटुंबियांशी किंवा नातेवाईकांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे तेरेसाच्या चिमुकल्यांना आता आईविना जगावं लागणार आहे.

vishwas.purohit@loksatta.com