पालिकेच्या प्रयत्नांना यश; उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांमध्ये जागृती

मुंबईमधील उघडय़ावर प्रातर्विधी उरकण्यात येणाऱ्या ११७ पैकी शिवडी परिसरातील चार ठिकाणे हागणदारीमुक्त करण्यात पालिकेच्या एल्फिन्स्टन (एफ-दक्षिण) विभाग कार्यालयाला यश आले असून शिवडीमधील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमधील चार झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सध्या मोबाइल शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या जानेवारीमध्ये या परिसरातील झोपडपट्टीवासीयांसाठी कायमस्वरूपी शौचालये उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र तत्पूर्वीच शिवडी हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पपूर्तीत पालिका यशस्वी ठरली आहे.

शिवडी हा मुंबईमधील मध्यवर्ती परिसर म्हणून ओळखला जातो. शिवडीमधील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. या झोपडपट्टय़ांमधील रहिवासी शौचालयांची व्यवस्था नसल्यामुळे उघडय़ावरच प्रातर्विधी करीत असल्याचे सव्रेक्षणात आढळून आले होते. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईत ११७ ठिकाणी उघडय़ावर प्रातर्विधी उरकण्यात येत असल्याचे आढळून आले होते. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील इंदिरा नगर, गिरी नगर, शिवडी कोळीवाडा आणि अमन शांती नगर या चार वस्त्यांचा त्यात समावेश असून पालिकेच्या एल्फिन्स्टन (एफ-दक्षिण) विभाग कार्यालयाने ही चारही ठिकाणे हागणदारीमुक्त करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. झोपडपट्टी परिसरात बॅनर झळकवून उघडय़ावर केल्या जाणाऱ्या प्रातर्विधीमुळे आरोग्याला निर्माण होणारे धोके, परिसरात होणारी अस्वच्छता आदींची माहिती देण्यात आली. केवळ जनजागृती आणि झोपडपट्टीवासीयांना मार्गदर्शन करून एफ-दक्षिण विभागातील अधिकारी थांबले नाहीत, तर त्यांनी चारही ठिकाणी मोबाइल शौचालये उपलब्ध केली आहेत.

इंदिरा नगर, गिरी नगर, शिवडी कोळीवाडा आणि अमन शांती नगर ही चारही ठिकाणे हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने तेथे कायमस्वरूपी शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

उघडय़ावर प्रातर्विधी उरकणाऱ्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील झोपडपट्टय़ांजवळ मोबाइल शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच पक्की शौचालये बांधण्याची कामे सुरू आहेत. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून येत्या १९ नोव्हेंबर रोजी एफ-दक्षिण विभाग हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, एफ – दक्षिण विभाग